विहिरीतील बिबट्याची शिडीच्या सहाय्याने जंगलात धूम

विहिरीतील बिबट्याची शिडीच्या सहाय्याने जंगलात धूम

अंबासन - रामतीर (ता. बागलाण) येथील शेतकरी देवीदास आहिरे यांच्या शेतातील विहिरीत रात्री पाण्याच्या शोधार्थ बिबट्या पडला. वन विभाग आणि ग्रामस्थांनी विहिरीत शिडी टाकून दुपारी बिबट्याला बाहेर काढले. सुमारे साडेतीन वर्षांचा बिबट्या विहिरीबाहेर पडताच जंगलाच्या दिशेने त्याने धूम ठोकली. यामुळे शेतात वस्ती करून राहणारे शेतकरी धास्तावले आहेत.

गाव व परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. तळवाडे भामेर येथे बिबट्याच्या हल्ल्यात अडीचवर्षीय बालक ठार झाल्याची घटना काल घडली असतानाच रामतीर येथील विहिरीत बिबट्या आढळल्याने परिसरात घबराट पसरली आहे. वन विभागाकडून जंगल व परिसरात कुठेही वन्यजीवांसाठी पाणवठे नसल्याने जंगली श्‍वापदे नागरी वस्तीकडे मोर्चा वळवीत आहेत. पावसाळा संपला मात्र रातीर, रामतीर, सुराणे, देवळाणे, वायगाव, सारदे, दुंधे या परिसरात सततचे पाण्याचे दुर्भिक्ष असते. जनावरांसह नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. 

देवीदास आहिरे शेतात गेले असता विहिरीत आवाज येत असल्याने त्यांनी डोकावून पाहिले असता बिबट्या नजरेस पडला. त्यांनी त्वरित शेजारील शेतकऱ्यांना माहिती दिली. केवळ आहिरे यांनी वन विभाग व पोलिस ठाण्यात माहिती दिली. जायखेडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीराम कोळी, दादाजी मोरे, अण्णा शेवाळे, शांताराम बोडके आदींनी घटनास्थळी दाखल होत गर्दी हटविली. ग्रामस्थांनी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाच तासांच्या प्रयत्नांनंतर शिडीच्या सहाय्याने बिबट्याला विहिरीबाहेर काढले. विहिरीबाहेर पडताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. 

यापूर्वीही लोणकरवाडी शिवारात भटू लोणकर यांच्या गायीला बिबट्याने ठार केले होते. वन विभागाने जंगलात पाणवठे तयार करावेत, तसेच वीज वितरण कंपनीने रात्रीचे भारनियमन बंद करून शेतात वस्ती करून राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सिंगल फेज योजना सुरू करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य कान्हू आहिरेंसह ग्रामस्थांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com