परतीच्या पावसाने शहरात दाणादाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नाशिक - शहर व परिसरात आज झालेल्या परतीच्या पावसाने अक्षरश: दाणादाण उडाली. दोन दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

नाशिक - शहर व परिसरात आज झालेल्या परतीच्या पावसाने अक्षरश: दाणादाण उडाली. दोन दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

नाशिक रोड - विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह नाशिक रोड परिसरात जोरदार पाऊस झाला. दोन दिवसांपासून नाशिक रोड परिसरात परतीचा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे शेतात पाणी साचल्याने बाजरी, ज्वारी आदी सोंगणीसाठी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. काही पिके वाऱ्यामुळे आडवी झाली. हाती आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. या पावसामुळे बाजारपेठेतील व्यावसायिकांचे हाल झाले. सजावटीचे साहित्य विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. नेहरूनगर, गांधीनगरमध्ये बाहेरच्या राज्यांतून आकाशकंदील बनविणाऱ्या कारागिरांचे साहित्य व आकाशकंदिलांचे नुकसान झाले.

झोपडपट्टीतील घरांत शिरले पाणी
देवळाली कॅम्प : येथे आज दुपारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे तळे साचले होते, तर झोपडपट्टीतील काही घरांत पाणी शिरले. आठवडे बाजारातही पाणीच पाणी झाले होते. ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास मुसळधारेला सुरवात झाली. त्यामुळे आठवडे बाजारात पळापळ झाली. लॅम रोडवर दुतर्फा पाणी साचले. शहरातही काही ठिकाणी पाण्याचे तळे साचले. लेव्हिट मार्केटमध्ये पाणी साचले होते. मार्केटमध्ये येणाऱ्यांना पाण्यातून मार्गक्रमण करावे लागले.