महाराष्ट्र-गुजरात पाण्यासंबंधी 9 ऑक्‍टोबरला मुंबईत बैठक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

नाशिक - महाराष्ट्र आणि गुजरातच्या पाण्याचा हिस्सा निश्‍चित झालेला नाही. मात्र, दोन्ही राज्यांतील अंतिम सामंजस्य करार होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हिश्‍याच्या पाण्याबद्दल चर्चा व्हायला हवी, अशी विनंती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करण्यात आली. त्यानुसार येत्या नऊ ऑक्‍टोबरला सकाळी अकराला मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि सचिवस्तरावर बैठक निश्‍चित झाली आहे.

किसान मंचच्या राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशनासाठी पवार यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्या वेळी "जलचिंतन'चे राजेंद्र जाधव आणि आमदार जाधव यांनी महाराष्ट्र-गुजरात पाण्यासंबंधी पवार यांच्याशी संवाद साधला. जाधव म्हणाले, की दमणगंगा-पिंजाळमधून 20 टीएमसी पाणी मुंबईला देऊन उर्वरित पाणी गुजरातला दिले जाणार आहे. नार-पार-तापी खोऱ्यातील पाण्याचा प्रश्‍न कायम आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नये, अशी विनंती पवार यांना करण्यात आली. चर्चेनंतर पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार ही बैठक होणार आहे.