महाराष्ट्र 'बंद' यशस्वी करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

nashik news maharashtra news farmer strike continues maharashtra bandh
nashik news maharashtra news farmer strike continues maharashtra bandh

नाशिक - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, कायद्याने उत्पादन खर्चावर आधारित भाव आदी मागण्यांसाठी सुरू असलेल्या शेतकरी संपाचा पुढील टप्पा म्हणून आज (सोमवारी) महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचा निर्धार नाशिकमध्ये शेतकरी नेत्यांनी केला. संप मागे घेण्याच्या घोषणेनंतर उडालेल्या गोंधळानंतरही आंदोलनाची धग कायम असून, राज्याच्या विविध भागांत आज रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. अनेक आठवडे बाजार बंद राहिले. शहरांमधील बाजारपेठांत "बंद' पाळण्यात आला. मुख्यमंत्र्यांसह कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले.

किसान क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीत फाटाफूट झाल्यावर नगर जिल्ह्यातील पुणतांब्याऐवजी शेतकरी संपाचे केंद्र नाशिक बनल्याच्या पार्श्‍वभूमीवर बाजार समितीत झालेल्या बैठकीत मंगळवारी (ता. 6) मुंबईत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर संघर्ष करणाऱ्या विविध संघटना-संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक, तर 8 जूनला खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांच्यासह विविध नेत्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये राज्यव्यापी परिषद होईल, असा निर्णय जाहीर करण्यात आला.

सभेच्या अध्यक्षस्थानी कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक होते. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील, किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, डॉ. गिरधर पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राजू देसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले उपस्थित होते. विविध राजकीय पक्षांचे स्थानिक नेते मात्र शेतकऱ्यांमध्ये बसले होते. त्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समावेश होता.

शेतकरीराजा आता जागा हो, नेते अथवा नोकरशाहीपुढे झुकू नको, असे आवाहन करत डॉ. मुळीक यांनी उद्या (ता. 5) महाराष्ट्र बंददरम्यान शेतकऱ्यांनी रस्त्याने वाहने जाऊ देऊ नयेत, अशी हाक दिली.

शेतकऱ्यांशी म्हणजे आईशी प्रतारणा असल्याने पोलिसांनी संरक्षणात वाहने सोडू नयेत, असे सांगून ते म्हणाले, की शेतीसह कुक्कुटपालन, दुग्धोत्पादन, मासेमारी, इमूपालन, रोपवाटिका अशा शेतीसंलग्न बाबींची संपूर्ण कर्जमुक्ती व्हायला हवी. उत्पादन खर्चावर आधारित भाव कायद्याने मिळायला हवा, तसेच शेतकऱ्यांचे झालेले नुकसान देण्याची जबाबदारी कायद्याने असायला हवी, यासंबंधाने शेतकऱ्यांनी आमदार, खासदारांच्या घरापुढे ठाण मांडावे. लोकप्रतिनिधींनी कायदा करून मगच गावाकडे यावे.

शेतकऱ्यांना खुल्या अर्थव्यवस्थेचा फायदा व्हायला हवा, असे अधोरेखित करत रामचंद्रबापू पाटील यांनी शेतकऱ्यांच्या पदरात घामाचे दाम पडावे, म्हणून सरकारचा हस्तक्षेप थांबावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. संप फोडल्याचा आनंद मुख्यमंत्र्यांना झाला असून, कृषिमूल्य आयोग नेमतो, हमीभावाच्या अनुषंगाने फौजदारी गुन्ह्याचा कायदा करतो, असे सांगत मुख्यमंत्री धूळफेक करत असल्याचे ते म्हणाले.

शेतकरी जिंकल्याशिवाय संप मिटणार नाही. संपाचे यापुढील काळात शेतकरी हेच नेतृत्व करतील, असे डॉ. नवले यांनी सुरवातीलाच सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. मुख्यमंत्र्यांनी विश्‍वासघात केला, पाठीत खंजीर खुपसला, संप फोडण्याचा प्रयत्न केला, असे आरोप करत त्यांनी शेतकऱ्यांनी संप पुढे सुरू ठेवल्याने मुख्यमंत्र्यांची रणनीती पराभूत झाल्याची टीका केली. सरकार अथवा पोलिसांकडून एकाही शेतकऱ्याला त्रास झाल्यास मग मात्र आम्ही सळो की पळू करून सोडू, हे ध्यानात ठेवावे.

श्री. देसले यांनी ठरावांचे वाचन केले. त्यास हात उंचावून उपस्थित शेतकऱ्यांनी मान्यता दिली. श्री. वडघुले यांनी प्रास्ताविकात सरकार पोलिसांकडून शेतकरी आंदोलन चिरडू पाहत असल्याचा आरोप केला.

बैठकीतील मंजूर ठराव
- शेतकरी संपात दाखल झालेले संपूर्ण गुन्हे तत्काळ मागे घ्या
- शेतकरी संपाच्या मागण्यांवर आश्‍वासन नको, तर मुख्यमंत्र्यांकडून मान्यता मिळाल्याखेरीज आम्ही हटणार नाही
- व्यापारी, वाहतूकदारांसह जनतेला संपाला पाठिंबा देण्याची विनंती करण्यात येत आहे

ठळक मुद्दे
- सरकार बहिरे असल्याची टीका करत जीन्स पॅंटच्या उल्लेखातून शेतकऱ्यांच्या अपमानाचा आरोप
- नगर जिल्ह्यातील मरण पावलेले शेतकरी अशोक मोरे यांना श्रद्धांजली
- जय जवान- जय किसानच्या घोषणेने दुमदुमला परिसर
- शेतकरी दरोडेखोर असते, तर कर्जबाजारी झाले असते काय? डोके पाहिजे ना, अशा शब्दांत दाखल गुन्ह्यांची उडवली खिल्ली
- आंदोलनकर्त्यांच्या आडून गुन्हेगार असा उल्लेख केल्याबद्दल पालकमंत्री गिरीश महाजन यांचा निषेध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com