संक्रमण पुण्यकाळात  भक्तीचा परिपोष

संक्रमण पुण्यकाळात  भक्तीचा परिपोष

नाशिक - मकरसंक्रांतीचे औचित्य साधत रविवारी (ता. १४) पहाटेपासून स्नानादी विधीसाठी गंगाघाटावर तुफान गर्दी उसळली होती. गोदावरीच्या दुतर्फा मिळेल त्या ठिकाणी गाड्या उभ्या करत भाविक, पर्यटकांचा जथा स्नानासाठी प्रथम रामकुंड व त्यानंतर विविध मंदिरांत गेल्याने पंचवटी परिसराला रविवारी पहाटेपासूनच यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. याकाळात फुले, फळे व वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांकडे खरेदीसाठी झुंबड उडाल्याने पंचवटीच्या अर्थकारणासही बूस्टर डोस मिळाला.

दुपारी एक वाजून ४६ मिनिटांनी सूर्याचा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश झाला. हे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी देशभरातील लाखो भाविकांनी सकाळपासून गंगाघाटावर तोबा गर्दी केली होती. देशाच्या विविध भागासह राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर पर्यटक भाविक दाखल झाल्याने गंगाघाटावर पहाटेपासून टुरिस्ट गाड्या उभ्या करण्यासाठी वाहनधारकांची लगबग सुरू होती. सकाळी नऊनंतर गर्दीत प्रचंड वाढ झाली. त्यामुळे गोदावरीच्या दुतर्फा सर्वत्र यात्रेकरू व त्यांच्या टुरिस्ट गाड्याच दृष्टीस पडत होत्या. मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करत भाविकांनी रामकुंड गाठत स्नानासाठी मोठी गर्दी केली होती. गर्दीत महिलांची संख्या लक्षणीय होती. रामकुंडातील स्नानानंतर रामकुंड परिसरात जमलेल्या पर्यटक भाविकांनी अन्नधान्यासह अन्य वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर दानही केले. 

दान स्वीकारण्यासाठी रामकुंडावर मोठी गर्दी उसळली होती. स्नानानंतर श्री काळाराम मंदिर, कपालेश्‍वर, सीतागुंफा, नारोशंकर, सांडव्यावरची देवी आदी ठिकाणी दर्शनासाठी गर्दी उसळली होती. संक्रमण पुण्यकाल सुरू झाल्याने दीडनंतर तर रामकुंड परिसरात पाय ठेवायलाही जागा नव्हती.

विविध मंदिरांत गर्दी 
गोदावरीतील स्नानानंतर अनेक भाविकांनी परिसरातील मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. पंचवटीतील विविध मंदिरांमधील दर्शनानंतर अनेक भाविकांनी शेअर रिक्षाचा लाभ घेत तपोवन गाठले. तपोवनातील लक्ष्मणरेखासह विविध मंदिरांमध्येही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तपोवनातील अस्वच्छतेमुळे अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली. 

रामकुंडातील अस्वच्छ पाण्यामुळे  भाविकांत नाराजी
मकरसंक्रांतीच्या संक्रमण पुण्यकालाचे महत्त्व जाणत आज भल्या पहाटेपासून रामकुंड परिसरात स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. परंतु यंदा जोरदार पर्जन्यवृष्टी होऊन तसेच गोदावरीवरील तिन्ही धरणांत मोठ्या प्रमाणावर साठा असूनही अस्वच्छ पाण्यात स्नान करावे लागल्याने राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेकांनी स्नान टाळत केवळ हातपाय धुणेच पसंत केले. दोन वर्षांच्या तुलनेत गतवर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने गोदावरीवरील मुख्य गंगापूरसह बेझे व कश्‍यपी धरणांत मोठ्या प्रमाणावर साठा आहे. असे असूनही ऐन संक्रांतीच्या काळात गोदावरी प्रवाही नसल्याने बाहेरहून आलेल्या भाविकांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. इतर कुंडांचे सोडा; परंतु याकाळात रामकुंड प्रवाहित ठेवणे प्रशासनाला शक्‍य असूनही भाविकांना गटारगंगेतच स्नान उरकावे लागल्याचे चित्र आहे. 

गोदावरीचा जन्मोत्सव
माघ शुद्ध प्रतिपदेपासून गोदावरीचा जन्मोत्सव सुरू होत आहे. मात्र, ऐन संक्रांतीच्या काळातच गोदावरी प्रवाहित नसल्याने गंगा- गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्‍ल यांनी ‘सकाळ’शी बोलताना नाराजी व्यक्त केली. पूर्वी गोदावरीच्या पात्रातील पाणी सोडणे किंवा थांबविणे यासाठी पुरोहित संघाला विश्‍वासात घेतले जात होते. परंतु आता परिस्थिती बदलली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र किमान याकाळात तरी रामकुंड प्रवाहित राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com