‘मेक इन नाशिक’चे यश राज्य सरकारच्याच हाती

‘मेक इन नाशिक’चे यश राज्य सरकारच्याच हाती

नाशिक - नाशिकच्या औद्योगिकविश्‍वात नव्याने गुंतवणूक वाढावी म्हणून ‘मेक इन नाशिक’ उपक्रम राबविला जात आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यात, या उपक्रमात केवळ उपस्थिती लावण्याबाबत करण्यात आलेले वक्तव्य व दुसरीकडे ‘मेक इन नाशिक’ची तयारी सुरू असतानाच जिल्ह्यातील प्रमुख सहा उद्योगांना प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नोटीस पाठवून उद्योग बंद पाडण्यासाठी केलेले प्रयत्न लक्षात घेता नाशिकमधील उद्योजकांच्या प्रयत्नांना कितपत यश मिळते, हे पाहणे नाशिककरांसाठी उत्सुकतेचे ठरताना दिसत आहे.

कोणीही वाली नसलेल्या नाशिकला पाच वर्षांसाठी मी दत्तक घेत असल्याचे विधान श्री. फडणवीस यांनी महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान केले होते. त्यामुळे नाशिककरांनी भाजपला भरभरून मतदान दिले. त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रविवार (ता. २८)च्या  दौऱ्याकडे नाशिककरांचे लक्ष लागले होते; परंतु महापालिकेने केलेल्या आर्थिक मागण्या धुडकावून लावत मुख्यमंत्र्यांची भूमिका ‘बघू, पाहू’ अशीच राहिली. ‘मेक इन नाशिक’ उपक्रमात शासनाची भूमिका काय, याबाबत विचारले असता उद्‌घाटन आपल्या हस्ते होणार असल्याचे सांगून त्यांनी मर्यादित भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे शासनाकडून या उपक्रमाला किती सहाय्य मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दुसरीकडे मेक इन नाशिकअंतर्गत उद्योगांना रेड कार्पेट टाकण्याचे ‘उद्योग’ सुरू असतानाच प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नाशिकमधील जिंदाल सॉ, राजराणी स्टील, एव्हरेस्ट मोन्टेस ग्लास, गिरीमा व गोंगलू फूड या सहा कंपन्यांना प्रदूषणाचे कारण दाखवत बंदच्या नोटिसा बजावल्या आहेत. यावरून मेक इन नाशिक उपक्रमांतर्गत नाशिकमध्ये किती उद्योग येतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

जुने प्रकल्प घुसविण्याचा प्रयत्न?

नाशिक जिल्ह्यात उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असली, तरी शासनाच्या उदासीनतेमुळे उद्योग येण्यास तयार नाहीत. गेल्या वर्षी दुष्काळात मराठवाड्याला सोडलेले नाशिकचे पाणी, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्थलांतराचा प्रयत्न, एकलहरा औष्णिक वीज केंद्र बंद पाडण्याच्या हालचाली याबाबत आधीच भाजप सरकारवर संशय घेतला जात आहे. एकंदरीत नाशिककरांमध्ये सरकारचा नाशिककडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यात आपण नाशिकसाठी काहीतरी करत आहोत हे दाखविण्यासाठी मेक इन नाशिक उपक्रमात मंजूर झालेले प्रकल्प घुसविण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. अक्राळे (ता. दिंडोरी) येथे जिंदाल पॉलिथिन कंपनीने दीडशे हेक्‍टर जागेवर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तो मंजूर झालेला प्रकल्प मेक इन नाशिकमध्ये दाखविण्याची धडपड सुरू असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून नाशिकमध्ये नव्याने गुंतवणूक झालेली नाही. वाढत्या स्पर्धेमुळे आहे ते उद्योगही अन्य राज्यांमध्ये स्थलांतरित होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर निमा, आयमा, क्रेडाई, एमआयडीसी या संस्थांतर्फे हा उपक्रम राबविला जात आहे. महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, खासदार हेमंत गोडसे, हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार सुधीर तांबे, हेमंत टकले, जयवंत जाधव, डॉ. अपूर्व हिरे, प्रा. देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर हेदेखील उपक्रमाला हजेरी लावणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन एम. एन. ब्राह्मणकर, हरिशंकर बॅनर्जी, उदय खरोटे, मंगेश पाटणकर, सुनील कोतवाल, उमेश वानखेडे यांनी केले आहे.

असे आहेत कार्यक्रम
उद्‌घाटनाच्या पहिल्या सत्रानंतर दुपारच्या तांत्रिक सत्रात नाशिकला मोठे करण्यात योगदान देणाऱ्यांच्या यशामागील गुपित या विषयावर चर्चासत्र होईल. यात, सह्याद्री ॲग्रो फार्मचे विलास शिंदे, ‘ईएसडीएस’चे व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमाणी, सुला वाइनचे नीरज अग्रवाल मार्गदर्शन करतील. वंदना सोनवणे अध्यक्षस्थानी राहतील. बुधवारी (ता. ३१) सकाळी साडेदहा ते दुपारी बारा यादरम्यान रोल ऑफ कॉर्पोरेट्‌स इन द डेव्हलपमेंट ऑफ रिजन या विषयावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे हासित काझी व नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे मार्गदर्शन करतील. दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत फ्रॉम नॅपा व्हॅली टू सिलिकॉन व्हॅली- ए सिटी ट्रान्स्फॉर्मेशन या विषयावर जयप्रकाश टापरिया, प्रवीण तांबे, अभय देशपांडे, आशितोष राठोड, संजय गुप्ता मार्गदर्शन करतील. सायंकाळी पाचच्या सुमारास समारोपाचा कार्यक्रम होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com