दगडाच्या नव्हे, शैक्षणिक मंदिरांची गरज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

पंचवटी - जोपर्यंत समाजाचा स्वाभिमान जागृत होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला काहीच मिळणार नाही. केवळ आपल्यापुरता विचार न करता बहुजन समाजाचा विचार केल्यास राज्यासह देशाची सत्ता ताब्यात येऊ शकते. जो दुसऱ्यासाठी जगतो, तो संत ठरतो अन्‌ स्वतःसाठी जगणारा माणूस. माळी समाजातून खऱ्या अर्थाने समाज घडविणारे कार्यकर्ते तयार व्हावेत. आज दगडाच्या नव्हे, तर शैक्षणिक मंदिरांची गरज आहे, असे प्रतिपादन ॲड. संभाजीराव बोरुडे यांनी आज केले.

जिल्हा माळी समाज नियोजन समितीतर्फे आज दुपारी चारला द्वारका परिसरातील माळी मंगल कार्यालयात माळी समाज चिंतन व स्नेहमेळावा झाला. त्या वेळी ‘माळी समाजापुढील आव्हाने’ याविषयावर ॲड. बोरुडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मेळाव्यास जिल्ह्याच्या अनेक भागातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्याच्या काळात समाजाचे स्थान काय? स्वरूप काय? प्रगतीच्या वाटा किती? याबाबत मान्यवरांचा परिसंवाद झाला. ज्येष्ठ विचारवंत हरी नरके काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. ॲड. संभाजी पगारे यांनी ‘माळी समाज संघटन ः काळाची गरज’ याविषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला समाजातील युवा कलाकारांनी सादर केलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी रचलेल्या गीतांचा संगीतमय आविष्कार सादर करण्यात आला. आमदार देवयानी फरांदे, सुहास फरांदे, बाजीराव तिडके यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

कालेलकर, मंडल आयोग आम्हाला कळलाच नाही. त्यामुळे आमचे हक्क, स्वाभिमानही आमच्यापासून दूर गेला, असे सांगून ॲड. बोरुडे यांनी राज्य विधानसभेतील २८८ आमदारांपैकी तुमच्या समाजातील किती?, सहकार क्षेत्रात किती? असा प्रश्‍न केला. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता, भ्रष्टाचार एकट्यानेच केला का? तीन वर्षांत कोणीच सापडले नाही का? असा प्रश्‍न त्यांनी केला. ‘नाक दाबले की तोंड उघडते’ या न्यायाने जोवर तुमचा स्वाभिमान जागृत होत नाही, तुम्ही रस्त्यावर उतरेपर्यंत असेच सुरू राहील, असा इशारा दिला. बहुजन समाज एकत्र आल्यास राज्यासह देशाची सत्ता दूर नाही, असा आशावादही त्यांनी  उपस्थितांत जागविला.