नाशिक: मनोरुग्णाकडून कुऱ्हाडीने वार करून तिघांची हत्या

संजीव निकम/शशिकांत पाटील 
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

रवींद्रने पहिला हल्ला आपले आजोबा केशव कचरू बागुल (वय ६०) यांच्यावर केला. त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले त्यांनतर तो घराबाहेर सुटला व शेतात कामाला जाणाऱ्या विक्रम मंगू पवार (वय ५०) यांच्यावर त्याने हल्ला चढविला.

नांदगाव : तालुक्यातील हिंगणे-देहरे येथे सकाळी शेतात कामाला जाणाऱ्या तिघांची मनोरुग्णाने कुऱ्हाडीने वार करून निर्घृणपणे हत्या केली.

या हत्याकांडाने घडवून आणल्याने तालुका हादरून गेला असून, पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. या मनोरुग्णाने समोर दिसेल त्याच्यावर कुऱ्हाडीने वार करीत सुटला होता. त्यांनतर एकच धावपळ उडाली जो तो आपला जीव वाचविण्याच्या आंकाताने रस्ता मिळेल, त्या दिशेने धाव घेत होता. 

हत्याकांड घडविल्यानंतर रवींद्र पोपट बागुल हा घटनास्थळापासून एका किलोमीटर अंतरावरील मारुतीच्या मंदिरात दबा धरून बसला होता. मात्र त्याचा पाठलाग करणाऱ्या गावकऱ्यांनी त्याला शिताफीने दाबून धरले व कोंडून ठेवले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीला नांदगावच्या पोलिस स्थानकात आणले आहे. रवींद्रने पहिला हल्ला आपले आजोबा केशव कचरू बागुल (वय ६०) यांच्यावर केला. त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले त्यांनतर तो घराबाहेर सुटला व शेतात कामाला जाणाऱ्या विक्रम मंगू पवार (वय ५०) यांच्यावर त्याने हल्ला चढविला. पुन्हा त्यांनतर त्याने सुभाष भीमा चव्हाण (वय ६०) यांच्यावर असाच हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात तिघांचे मृतदेह पडल्यावर रवींद्र पुन्हा इतरांवर हल्ला करण्यासाठी निघाला. मात्र जिवाच्या आकांताने पळाल्यामुळे या हत्याकांडाची व्याप्ती तिघांपुरती थांबली. असे घटनास्थळावर जमलेल्या गावकऱ्यांकडून कळले. तीन चार दिवसापूर्वीच रवींद्रला त्याच्या कुटुंबीयांनी सापुतारा जवळच्या चिखली येथील एका वैदूकडे उपचारासाठी नेल्याची प्राथमिक माहिती आहे.