मनमाड रेल्वेस्थानकातून बेकायदा मालवाहतूक

मनमाड रेल्वेस्थानकातून बेकायदा मालवाहतूक

मनमाड - मनमाड रेल्वेस्थानकाची सुरक्षा रामभरोसे झाली असून, रेल्वेस्थानकातून बेकायदा मालवाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भुसावळ मंडल रेल्वे बोर्डाचे सदस्य दिलीप नरवडे यांनी काल (ता. १५) मध्यरात्री बेकायदा माल पकडून दिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांनी रातोरात मालाचे बुकिंग करून माल पाठवून दिला असून, याबाबत मौन बाळगले आहे. त्यामुळे रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसानही होत आहे. याबाबत नरवडे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

मनमाड रेल्वेस्थानक जंक्‍शन असून, देशभरात जाण्या-येण्यासाठी येथे रेल्वे गाड्या असतात. त्याचप्रमाणे या जंक्‍शन स्थानकावरून देशभरात शेतमाल व इतर मालही मालवाहतूक डब्याने पाठविला जातो. यासाठी रेल्वेस्थानकावर तिकीट बुकिंग ऑफिसशेजारी पार्सल बुकिंग ऑफिस आहे. या बुकिंग ऑफिसमध्ये माल बुक करून तो देशभरात मालवाहतूक डब्याने पाठविला जातो. देशभरातील मोजक्‍या रेल्वेस्थानकांपैकी एक मनमाड रेल्वेस्थानक असल्याने देशभरात हायअलर्ट जारी केला असता. याही स्थानकावर दक्षतेचा इशारा दिला जातो. त्यामुळे एक महत्त्वपूर्ण स्थानक असताना या स्थानकाची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. या स्थानकातून बेकायदा माल वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून होत असून, यात रेल्वे अधिकारी व अनधिकृत कार्टिंग एजंट यांचा आर्थिक हितसंबध असल्याची चर्चा आहे. सुरक्षेचे व रेल्वेच्या फायद्याचे सर्व नियम धाब्यावर बसवून येथे बेकायदा माल वाहतूक होत असल्याने काल (ता. १५) मध्यरात्री अडीचच्या सुमारास फलाट क्रमांक १ व २ वर अशाच प्रकारचा बेकायदेशीर माल भुसावळ रेल्वे बोर्डाचे सदस्य दिलीप नरवडे हे गेले असता त्यांना आढळून आला. संबंधित माल हा बेकायदेशीर होता. हा माल मध्यरात्रीच्या गाडीने पार्सल होणार होता. बुकिंग नसलेला माल रेल्वे फलाटावर आलाच कसा, असा संशय नरवडे यांना आल्याने त्यांनी तत्काळ पार्सल बुकिंग ऑफिसचे अधिकाऱ्यांना बोलावून जाब विचारला. संबंधित प्रकार उघडकीस आल्याने अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली. या अधिकाऱ्यांनी संबंधित मालाचे रातोरात बुकिंग करून माल रवाना केला. दरम्यान, याबाबत नरवडे यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. तसेच रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या रेल्वे सुरक्षा बल, तसेच लोहमार्ग पोलिसांना हा बेकायदेशीर माल फलाटावर पडलेला असतानाही कसा दिसला नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

रेल्‍वेमंत्र्यांकडे तक्रार 
बोर्ड सदस्‍य दिलीप नरवाडे यांनी रेल्‍वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे तक्रार केली आहे. यात अनधिकृत कार्टिंग एजंटांना हटविण्यात यावे, भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास बुकिंग कार्यालयातील अधिकारी, अनधिकृत कार्टिंग एजंट, आरपीएफ, जीआरपीएफ अधिकारी यांना जबाबदार धरण्यात यावे असे नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com