महाराष्ट्र शासनाचे सावरकरांबाबत अशुद्धलेखन

भीमराव चव्हाण 
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

नाशिक - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थळ म्हणून त्यांच्या असंख्य देश-विदेशातील चाहत्यांना वंदनीय असलेल्या भगूर येथील सावरकरांच्या जन्मस्थळाबाबत महाराष्ट्र शासनाचाच अडाणीपणा समोर आला आहे. भगूरस्थित या ऐतिहासिक वास्तूबाहेर महाराष्ट्र शासनाने लावलेल्या नामफलकात शुद्धलेखनाच्या अक्षम्य चुका आहेत. त्यामुळे फलक वाचणारे बुचकाळ्यात पडल्याशिवाय राहत नाहीत.

वास्तूसमोर उभे राहिल्यास उजव्या हाताला दिसणाऱ्या या भल्यामोठ्या फलकावर ‘महाराष्ट्र शासन पुरातत्त्व व वस्तु संग्रहालय संचालनालय, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, जन्मस्थान, भगूर, ता. जिल्हा नाशिक’, असा उल्लेख अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र फलकावर प्रत्येक शब्दातील ‘र’ आणि ‘क’ ही अक्षरे चुकीची लिहिलेली आहेत. त्यामुळे ही अक्षरे धड ‘र’ आणि ‘क’ आहेत की आणखी काही वेगळेच, असा प्रश्‍न पडतो. तसेच ‘संचालनालय’ या शब्दातील काना आणि एक ‘ल’चा उल्लेखच नाही. फलकावरील अशुद्ध लिहिलेली माहिती वाचताना भेट देणाऱ्यांचा गोंधळ होऊन कदाचित सावरकरांच्या काळातील मराठी लेखनाची ही पद्धत असेल, असा समज करून घेतला जातो. 

प्रत्यक्षात मात्र हा फलक बनविताना मराठी अक्षरलेखनात झालेल्या या शुद्धलेखनाच्या अक्षम्य चुका असल्याचे लक्षात येते. हा फलक बनविताना संबंधितांकडून कोणत्याही प्रकारच्या शुद्धलेखनाची तपासणी झाली नसल्याचे लक्षता येते. तसेच ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हा फलक येथे लावला त्यांचेही मराठी शुद्धलेखन कितपत आहे, हे स्पष्ट होत आहे. यामुळे वेळोवेळी मराठी राजभाषेच्या विकासासह मराठीविषयी विविध प्रकारच्या घोषणा करणारे राज्य शासनच शुद्धलेखनाबाबत किती जागृत आहे, याचे हे एक उदाहरण  ठरत आहे.