गरिबीचे नव्हे, ‘श्रीमंती’चे मार्केटिंग

गरिबीचे नव्हे, ‘श्रीमंती’चे मार्केटिंग

के. सी. पांडे - गारगोटी ‘ग्लोरी’; हिऱ्यापेक्षा अधिक भावाने विकण्याची क्षमता

नाशिक - आपण गरिबीची चर्चा अधिक करतो, पण मनुष्यबळ ही आपली बौद्धिकसंपदा आहे. विपुल साहित्य आणि विविधता असूनही सारे जण गुण्यागोविंदाने राहत आहोत, ही जमेची बाजू आहे, असे सिन्नरच्या गारगोटी संग्रहालयाचे संचालक के. सी. पांडे सांगत होते. 

‘सकाळ’च्या संपादकीय सहकाऱ्यांशी गप्पा मारताना त्यांनी गारगोटी ‘ग्लोरी’ मांडत, आपण गरिबीचे नव्हे, ‘श्रीमंती’चे मार्केटिंग करतो, असे मोठ्या अभिमानाने सांगितले. १९७७ मध्ये भारतीय नौदल सेवा स्वीकारल्यापासून गारगोटी संग्रहाचा त्यांना जडलेला छंद आता २०० कोटींपर्यंत पोचला, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

गारगोटी ही श्रीमंत आहे. तिच्या संग्रहाची सुरवात श्री. पांडे यांनी दोन लाख ७५ हजारांच्या गुंतवणुकीपासून केली. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या या छंदातून ते पाचशे जणांना रोजगार देताहेत. 

सैन्यदल हा श्‍वास बनलेले श्री. पांडे कर्माला प्राधान्य देतात. त्यांच्या म्हणण्यानुसार यशाची उंची गाठण्यासाठी भाग्य आणि पुरुषार्थाचा संगम व्हायला हवा. शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते संग्रहालयाचे उद्‌घाटन झाले होते. आपल्या देशात गारगोटी या खनिज संपत्तीची साठवणूक आणि संरक्षण करण्याचा कसल्याही प्रकारचा कायदा नाही, असे सांगत त्यांनी दहा कोटींचा कर भरल्याचे स्पष्ट केले. 
सैन्यदलाच्या सेवेत असताना सुट्यांच्या कालावधीत घरी जाण्याऐवजी गारगोटीचा शोध त्यांचा सुरू राहिला होता. हिऱ्यापेक्षाही अधिक भावाने विकली जाण्याची गारगोटीची क्षमता असल्याचे ते आवर्जून सांगतात.

शिर्डीत संग्रहालयास प्राधान्य
शिर्डीत श्री. पांडे यांना संग्रहालय साकारायचे आहे. ऐंशी कोटींची जमीन आणि सिन्नरमधील संग्रहालयातील दीडशे कोटीच्या गारगोटी, अशी मालमत्ता असलेले श्री. पांडे सैन्यदलातील निवृत्तीमधून मिळणारे तीस हजारांचे वेतन ते गारगोटीमध्ये गुंतवतात. शिर्डीत संग्रहालय उभे राहिल्यानंतर गारगोटीचे स्वतःचे विमान असावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. प्रत्येकाने निसर्ग वाचायला शिकण्याबरोबरच पालकांनी मुलांमधील ज्ञान ओळखून त्यास प्रोत्साहन द्यायला हवे, असेही त्यांनी नमूद केले.

अनास्था दूर व्हायला हवी
महाराष्ट्र खनिज संपदेचे आगार आहे. जिल्हानिहाय भूगर्भशास्त्रतज्ज्ञ आहेत. मात्र, त्यांच्यासाठी सुविधा नाहीत. हे कमी काय म्हणून जीसीटी लागू झाल्यावर पहिल्यांदा १२ नंतर ५ टक्के कर सांगण्यात आला, असे नमूद करून श्री. पांडे म्हणाले, की कडकपणावर कर ठरतो, असे अधिकारी सांगतात. गारगोटी अनाथ असल्याने कुणीही तिचे पालकत्व स्वीकारायला होत नाही. ही अनास्था तत्काळ दूर व्हायला हवी. खाणीतून काढल्यावर चार तासांत प्रक्रिया न केल्यास गारगोटीची किंमत राहत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com