प्रवासी विमान अतिरेक्यांकडून हायजॅक

प्रवासी विमान अतिरेक्यांकडून हायजॅक

नाशिक - ठिकाण ओझर एचएएल... वेळ सकाळी दहाची... अचानक सुरू झालेल्या धावपळीने गोंधळ उडतो... काही मिनिटांत सायरन वाजत पोलिसगाडी, अग्निशमन दलाचे बंब, आरोग्य खात्याच्या रुग्णवाहिका घटनास्थळी येतात... जिल्हा प्रशासनाला परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर अतिरेक्‍यांनी प्रवासी विमान हायजॅक केल्याचे समजताच सर्वांच्या चेहऱ्यावर तणाव... परंतु समयसूचकता राखत कमांडो प्रवाशांची सुरक्षित सुटका करतात... तासभर विमानतळावर एकच थरार... 

आज जिल्हा प्रशासनाच्या मॉकड्रिलमध्ये थरारनाट्य अनुभवास मिळाले. विमान हायजॅकसारखी आपत्ती ओढावल्यास कशा प्रकारे उपाययोजना केल्या जाऊ शकतात? त्यास यंत्रणा सज्ज आहे का? याचा अंदाज यानिमित्त घेण्यात आला. सर्व यंत्रणा अपेक्षित वेळेत पोचतात की नाही, याची चाचपणी यानिमित्ताने घेतली गेली.

सकाळी दहाच्या सुमारास ओझर विमानतळावरून जिल्हा आपत्ती निवारण कक्षाला फोन आला. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याशीही एचएएल अधिकाऱ्यांनी संपर्क साधून अतिरेक्‍यांनी एक प्रवासी विमान हायजॅक केल्याची माहिती दिली. त्यानंतर आपत्ती निवारण विभागाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पोलिस अधीक्षक, अग्निशमक दल, नागरी संरक्षण दल, आरोग्य, दूरसंचार खात्याशी संपर्क साधून तातडीने घटनास्थळी दाखल होण्याचे आदेश दिले.

अवघ्या पंचवीस मिनिटांत सर्व यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी आवश्‍यक त्या उपाययोजनांसह दाखल झाले. तोपर्यंत प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी खेडकर यांनी अतिरेक्‍यांच्या मागण्यांबाबत त्यांच्या म्होरक्‍याशी चर्चा सुरू केली. त्यांनी ऑर्थर रोड कारगृहात खितपत पडलेल्या आपल्या चार साथीदारांना सोडविण्यासाठी आम्ही अपहरण केल्याचे स्पष्ट केले. ती माहिती मिळताच अतिरेक्‍यांना रोखण्यासाठी कमांडोंनी तातडीने हालचाल करत विमानात छुप्या मार्गाने प्रवेश करत अतिरेक्‍यांच्या मुसक्‍या आवळल्या आणि विमानातील सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका केली. 

अपेक्षेपेक्षा मिळाला चांगला प्रतिसाद
भविष्यात असा एखादा आपत्तीजनक प्रसंग ओढावल्यास जिल्ह्यातील आपत्ती निवारण यंत्रणा कितपत सज्ज आहे, याची चाचणी या मॉकड्रिलच्या रूपाने झाली. यापूर्वीच्या मॉकड्रिलपेक्षा आज प्रतिसाद देण्याची गती चांगली असल्याचा शेरा अधिकाऱ्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com