तरूणाईला मुखाच्या कर्करोगाने ग्रासले!

तरूणाईला मुखाच्या कर्करोगाने ग्रासले!

आरोग्य विभागाची आकडेवारीः राज्यभर तपासणी, जिल्ह्यातील किमान 25 लाखांचे "टार्गेट'
नाशिक - राज्यातील 35 टक्के तरुणवर्ग व्यसनाधीन असल्याची आकडेवारी आरोग्य विभागाकडे आली असून, येत्या काळात मुखाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या तरुणपिढीची गंभीर समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाकडून डिसेंबर महिन्यामध्ये राज्यभर किमान 30 वर्षांवरील तरुणांची मौखिक कर्करोगाची तपासणी केली जाणार आहे. जिल्हा रुग्णालयांपासून ते उपकेंद्रांच्या माध्यमातून शहर ते वाड्यापाड्यांपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातून किमान 25 लाख तरुणाईच्या मुखाची कर्करोग तपासणी होईल. कर्करोगसदृश लक्षणे आढळून आल्यास संबंधितांवर तातडीने उपचार सुरू केले जाणार आहेत.

येत्या 1 डिसेंबरपासून राज्यभर जिल्हा रुग्णालयांतर्गत सामान्य रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांच्या माध्यमातून तालुक्‍यापासून ते खेडे-पाडे - वाड्या-वस्त्यांपर्यंत वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी यांच्यामार्फत किमान 30 वर्षांवरील तरुणांच्या मुखाची (तोंडाची) कर्करोगाच्या दृष्टीने तपासणी केली जाणार आहे. राज्यातील 35 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक तरुणवर्ग हा तंबाखू- गुटख्याच्या आधीन असल्याने तरुण वयामध्येच कर्करोगग्रस्त रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे या तपासणी मोहिमेच्या माध्यमातून तालुकास्तरावर वैद्यकीय अधिकारी- अधीक्षक, प्राथमिक आरोग्य व आशा कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक घराला भेट देऊन घरातील तरुण सदस्याच्या मुखाची तपासणी केली जाणार आहे.

डिसेंबर महिन्यामध्ये राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेमध्ये एका जिल्ह्यामध्ये किमान 25 लाख तरुणांच्या तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. ज्या तरुणांच्या मुखांची तपासणी केली जाईल, त्यामध्ये कर्करोगसदृश लक्षणे आढळून आल्यास त्याची जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये कर्करोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाईल.

जिल्हास्तरावर कार्यशाळा
राज्यव्यापी मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे जिल्हा रुग्णालयांमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी- अधीक्षकांसाठी कार्यशाळा घेतली जात आहे. याच कार्यशाळेनुसार तालुकास्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्याधिकारी, कर्मचारी व आशा कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच, कर्करोगाचा गंभीरस्वरूपाचा रुग्ण आढळून आल्यास त्यास तातडीने जिल्हा रुग्णालय व कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठी शासनाच्या 108 रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

तोंडाच्या कर्करोगाने ग्रस्त तरुणाईला वेळीच त्यापासून मुक्‍त करण्यासाठीचा उपक्रम असून, येत्या डिसेंबर महिन्यात जिल्ह्यासह राज्यभर ही मोहीम राबविली जाणार आहे. निदान झालेल्या रुग्णावर वेळीच उपचार झाल्यास त्याची कर्करोगापासून सुटका होऊ शकेल.
- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com