वीजमीटर वाटप नोंद टाळल्याबद्दल  तीन अभियंते निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

नाशिक रोड - वीजग्राहकांना वीजमीटर देताना त्याची नोंद न ठेवणे, कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित थकबाकीदार ग्राहकांना वीजमीटर देणे अशा विविध अनियमितता करणाऱ्या तीन अभियंत्यांवर महावितरणने निलंबनाची कारवाई केली. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या आदेशान्वये मुख्यालयातील अधिकाऱ्यांमार्फत राज्यात मीटरवाटपाच्या नोंदीबाबत तपासणी करण्यात येत असून, त्याअंतर्गत दोषींवर कारवाई करण्यात आली.

महावितरणच्या मीटर वाटपात अनियमितता करण्यात येत असल्याच्या तक्रारींची दखल घेत संजीव कुमार यांनी मुख्यालयातील अधिकाऱ्यांना मीटर वाटपाच्या नोंदीबाबत काही परिमंडलांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्वरित तपासणी करण्याचे आदेश दिले होते. कल्याण, नाशिक, नगर, औरंगाबाद  व जळगाव येथील मीटर वाटपाच्या नोंदीची तपासणी केली. कंपनीतर्फे विकत घेतलेल्या प्रत्येक मीटरची नोंद ही महावितरणच्या ईआरपी प्रणालीमध्ये ठेवण्यात येते. नाशिक परिमंडलातील चांदवड उपविभागांतर्गत दुगाव शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता यांनी ग्राहकांना वीजजोडणी दिली. मात्र, त्याची नोंद ईआरपी प्रणालीत न केल्याने ग्राहकाचे वीजबिलिंग सुरू झाले नाही. तसेच मीटरच्या नोंदी ईआरपी प्रणालीत न केल्यामुळे मीटर वापराविना पडून राहिल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. कल्याण परिमंडलातील खालापूर उपविभाग व शाखा कार्यालयात कार्यरत उपकार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता यांनी नोंद न घेता ग्राहकांना वीजमीटर दिले. त्यामुळे ग्राहकांना वापरलेल्या विजेचे बिलच मिळू शकले नाही. तसेच कायस्वरूपी वीजपुरवठा खंडित थकबाकीदार ग्राहकांचे मीटर बदलून दिल्याने अशा ग्राहकांचा वीजपुरवठा पैसे न भरता सुरळीत झाला व कंपनीचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे दोघा अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवले नाही, या कारणास्तव मुख्य अभियंत्यांचेही स्पष्टीकरण मुख्यालयाने मागविले आहे.