शहरात वीजतारा भूमिगत करण्याचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

नाशिक - अनेक वर्षांपासून शहरातील प्रमुख मार्गांवरील वीजतारा भूमिगत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वीज कंपनीचे अधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये आज बैठक झाली. नागपूरच्या धर्तीवर नाशिक महापालिका वीज कंपनीला ठरावाद्वारे ना हरकत दाखला देणार आहे. वीज कंपनीला मिळालेल्या ८७ कोटींमधून पहिल्या टप्प्यात तारा भूमिगत केल्या जाणार आहेत.

रामायण बंगल्यावर बैठकीला महापौर रंजना भानसी, आयुक्त अभिषेक कृष्णा, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेते दिनकर पाटील, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर, वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील पावडे, थोरात आदी उपस्थित होते. राज्य शासनाने राज्यातील प्रमुख शहरांमध्ये वीजतारा भूमिगत करण्याचे नियोजन केले आहे. वीज कंपनीला शहरातील वीजतारा भूमिगत करण्यासाठी महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. तारा भूमिगत करताना रस्ते फोडले जातात. त्यासाठी भरपाई म्हणून २० टक्के रक्कम अदा करावी लागते. त्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण होते. नागपूर शहरात तारा भूमिगत करताना महापालिकेने ठराव करून वीज कंपनीला तारा भूमिगत करण्याची परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर नाशिक शहरात उपक्रम राबविला जाणार आहे. नाशिक शहरातील तारा भूमिगत करण्यासाठी सुमारे बाराशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात वीज कंपनीने सुमारे ८७ कोटींचा निधी राखून ठेवला आहे. नागपूरच्या धर्तीवर ना हरकत दाखला देण्याची मागणी अधिकाऱ्यांनी महापालिकेकडे केली. त्यानुसार ठरावाच्या माध्यमातून रस्ते खोदण्यास परवानगी दिली जाणार आहे. रस्ते खोदताना पाइपलाइन, टेलिफोन किंवा अन्य विभागांच्या केबल तुटल्यास त्याची भरपाई वीज कंपनीला द्यावी लागणार आहे. वीजतारा भूमिगत झाल्यानंतर खर्चासह सर्व सोपस्कार पाडले की नाही, याची पाहणी महापालिकेकडून होईल. त्यानंतर ना हरकत दाखला वीज कंपनीला दिली जाणार असल्याचे महापौर भानसी यांनी सांगितले.

Web Title: nashik news mseb electricity