महापालिका आयुक्तांच्या पाठीशी महापौर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

नाशिक - महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याविरोधात दंड थोपटणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संघटनेला आज महापौर रंजना भानसी यांनी धक्का दिला. 

नाशिक - महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याविरोधात दंड थोपटणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संघटनेला आज महापौर रंजना भानसी यांनी धक्का दिला. 

वर्षभरात आयुक्तांच्या कामकाजाचा विचार करता शहराची प्रथम नागरिक म्हणून पाठीशी असल्याचे त्यांनी आज जाहीर केले. कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे, अशी भूमिका घेत महापौरांनी आयुक्तांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेची हवा काढून घेतली आहे. महापालिका आयुक्त कृष्णा यांच्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळते, बैठकांमध्ये असंसदीय शब्दांचा वापर, नोकरीवर गदा आणण्याची धमकी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेठबिगारासारखी वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफिसर्स असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव, आमदारांकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने आयुक्त व अधिकारी यांच्यातील शीतयुद्धाचा भडका उडाला. या पार्श्‍वभूमीवर महापौर भानसी यांनी या वादात उडी घेताना आयुक्त कृष्णा यांची पाठराखण केली आहे. आयुक्तांचे काम चांगले आहे. खतप्रकल्प, घंटागाडी, स्वच्छ भारत अभियान, गोदावरी स्वच्छता, बांधकाम परवानग्यांबाबत घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे कामकाजाला गती मिळाली आहे. त्यामुळे आयुक्तांच्या पाठीशी ठाम असल्याचे त्यांनी जाहीर केले. चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईलच, असेही त्यांनी जाहीर केल्याने आयुक्तांना बळ मिळाले आहे. आता प्रशासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावणारे अधिकारी काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

अभिषेक कृष्णा यांनी महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार घेतल्यानंतर महापालिकेच्या कामकाजाला गती दिली आहे. त्यांचे काम चांगले असल्याने त्यांना समर्थन आहे.
- रंजना भानसी, महापौर