साने, जाधव, भागवत, दीक्षित, गोडसेंना लॉटरी

साने, जाधव, भागवत, दीक्षित, गोडसेंना लॉटरी

नाशिक - गेल्या सात महिन्यांपासून रखडलेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्‍त्यांना आज अखेरीस मुहूर्त लागला. भाजपचे अजिंक्‍य साने, प्रशांत जाधव व बाजीराव भागवत, तर शिवसेनेच्या ॲड. श्‍यामला दीक्षित व सुनील गोडसे यांची नियुक्ती आज महापौर रंजना भानसी यांनी जाहीर केली.

महापौरांची निवड झाल्यानंतरच्या पहिल्या बैठकीत स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करणे बंधनकारक असताना, आठ महिने नियुक्ती लांबणीवर टाकण्यात आल्याने भाजपला टीकेचे धनी व्हावे लागले होते. त्यात दररोज नवीन नावे येत असल्याने पक्षांतर्गत बंडाळी निर्माण होण्याची शक्‍यताही व्यक्त झाली. प्रत्यक्षात निवडणुकीत उमेदवारी देताना प्रत्येकाला स्वीकृत नगरसेवकाचे आश्‍वासन देण्यात आले होते. स्वीकृत नगरसेवकाची घोषणा होण्याची वेळ आली त्या वेळी चालढकल सुरू झाली. शिवसेनेने चौघांची नावे दिल्याने भाजपवर दबाव आला. भाजपकडे दीडशे इच्छुक होते. त्यातील ३८ इच्छुकांची नावे प्रदेशपातळीवर पाठविण्यात आल्याचा दावा केला जात होता. स्वीकृत सदस्यांची नावे निश्‍चित करून आज जाहीर करण्यात आली.

आमदारांना शह, कार्यकर्त्याला न्याय
आमदार प्रा. देवयानी फरांदे यांची घराणेशाहीला स्थान न देता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवकपदावर संधी देण्याची मागणी होती. त्याअनुषंगाने त्यांनी विजय साने यांचे पुत्र ॲड. अजिंक्‍य साने यांच्या नावाला विरोध केला होता. मुख्यमंत्र्यांकडून जेवढ्या ताकदीने महिला रुग्णालय भाभानगरला मंजूर करून घेण्यात आले, तेवढ्याच ताकदीने साने यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांकडे स्वीकृतसाठी आग्रह धरला होता. एकीकडे प्रा. फरांदे यांना रुग्णालयाच्या बाजूने न्याय देण्यात आला असला, तरी अजिंक्‍य साने यांना स्वीकृत सदस्यत्व देऊन फरांदे यांचे मध्य मतदारसंघात वर्चस्व वाढणार नाही, याची काळजीही घेण्यात आली. अजिंक्‍य यांच्या महापालिकेतील प्रवेशामुळे गिते गटाची ताकद वाढली आहे. प्रशांत जाधव यांचे नाव पालकमंत्र्यांकडून सुचविण्यात आले. पूर्व विधानसभा मतदारसंघ भक्कम करण्यासाठी आमदार बाळासाहेब सानप यांनी नाशिक रोड मंडल अध्यक्ष बाजीराव भागवत यांच्या नावाचा आग्रह धरला होता. गेल्या अनेक वर्षांपासून कार्यालय सचिव म्हणून कार्यरत असलेले सुनील गोडसे यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. ॲड. श्‍यामला दीक्षित शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com