महापालिकेचा कारभार झाला ‘प्रभारी’

महापालिकेचा कारभार झाला ‘प्रभारी’

नाशिक - दरमहा निवृत्त होणारे कर्मचारी-अधिकारी, अधिकाऱ्यांत स्वेच्छानिवृत्तीचे वाढते प्रमाण यामुळे रिक्त पदांची संख्या वाढत असल्याने महापालिकेचा कारभार सध्या प्रभारींच्या हातून सुरू आहे. रिक्त जागा भरण्यास परवानगी नसल्याने महत्त्वाच्या पाच विभागांसाठी शासनाकडून अधिकारी मागण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्या आकृतिबंधानुसार महापालिकेत सात हजार ५० पदे आहेत. त्यांपैकी सतराशे पदे सध्या रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये अधिकारी वर्गाच्या पदांचा समावेश आहे. प्रशासन उपायुक्तपद सहा महिन्यांपासून रिक्त आहे. कर विभागाचे प्रमुख हरिभाऊ फडोळ यांच्याकडे या विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे. शहर अभियंतापदावरून सुनील खुने यांच्या जागी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांच्याकडे थेट शहर अभियंतापदाचा कार्यभार सोपविला होता. पाणीपुरवठा विभागाच्या अधीक्षक अभियंत्याचा कार्यभार कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांच्याकडे सोपविला आहे. आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांच्याकडे प्रभारी कार्यभार होता. ३ नोव्हेंबरला मुदत संपूनही अद्याप ते या पदावर कार्यरत आहेत. प्रभारी पदाचा कार्यभार सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ देऊ नये, असा नियम आहे. डॉ. विजय डेकाटे यांची पुणे येथे बदली झाल्यानंतर वैद्यकीय अधीक्षकपदाचा प्रभारी कार्यभार डॉ. राजेंद्र भंडारी यांच्याकडे सोपविला आहे. विधी विभागाचे अधिकारी भास्कर मोरे यांच्याकडे उद्यान विभागाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. विद्युत विभागाचे अभियंता शरद बनकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्याकडील कार्यभार वनमाळी यांच्याकडे सोपविला आहे. नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय घुगे यांच्याकडे पर्यावरण विभागाचा प्रभारी कार्यभार सोपविला आहे.

सहाय्यक आयुक्तांची पदे रिक्त
महापालिका आस्थापनेवर सहा सहाय्यक आयुक्त पदे आहेत. त्यातील चार पदे भरली आहेत. चारपैकी आस्थापना विभागातील संतोष ठाकरे वगळता नितीन नेर यांची पश्‍चिम, तर निर्मला गायकवाड व सुनीता कुमावत यांची अनुक्रमे सिडको व सातपूर विभागीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.

पाच पदांची शासनाकडे मागणी
रिक्त पदे भरता येत नसल्याने महापालिका प्रशासनाने प्रशासन उपायुक्त, आरोग्य अधिकारी, जनसंपर्क, विधी व उद्यान निरीक्षक या पाच पदांसाठी शासनाने अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com