लोकन्यायालयात नाशिकचा राज्यात विक्रम

लोकन्यायालयात नाशिकचा राज्यात विक्रम

एक लाख २७ हजार खटले निकाली; एक अब्ज १६ कोटींची भरपाई
नाशिक - राज्यात सर्वाधिक प्रलंबित खटले निकाली काढताना नाशिक जिल्ह्याने राज्यात पुन्हा विक्रम प्रस्थापित केला. काल (ता. ९) एका दिवसात एक लाख २७ हजार प्रकरणे निकाली काढताना एक अब्ज १६ कोटींच्या नुकसानभरपाईचा उच्चांक गाठल्याची माहिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी आज येथे दिली.

काल देशात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विविध न्यायालयांत दहा लाख ४३ हजार १६ खटले सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत तीन लाख ६८ हजार ८५० खटले होते. त्यापैकी एक लाख २७ हजार चार खटले निकाली काढण्यात आले. राज्यातील इतर जिल्ह्यांत दोन लाख ४१ हजार ३८८ खटले निकाली निघाले. गेल्या लोकन्यायालयात नाशिकने राज्यात प्रथम क्रमांक पटकवताना २६ हजार खटले निकाली काढले होते. या वेळी हा आकडा एक लाखाने वाढल्याबद्दल न्या. शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

राज्यात सहा अब्ज २४ कोटी ९२ लाखांची वसुली या लोकन्यायालयाच्या माध्यमातून करण्यात आली. त्यापैकी एकट्या नाशिक जिल्ह्यात एक अब्ज १६ कोटींची वसुली करण्यात आली. या वेळी प्रथमच नाशिक व त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यांतील ग्रामपंचायतींना सहभागी करण्यात आले होते. त्यांची अनेक वर्षांची घरपट्टी व पाणीपट्टीही वसूल करण्यात आली.

न्यायाधीश शिंदे यांच्या आईचे सोलापूरला निधन झाले असताना बारा दिवस तेथेच थांबण्याऐवजी त्यांनी लोकन्यायालयाच्या कार्याला महत्त्व दिले. त्यांना विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश सुधीर बुक्‍के, मुख्य न्यायदंडाधिकारी एस. टी. डोके आणि जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, वकील संघ यांनी सर्वतोपरी मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com