इतिहास जिवंत ठेवणारा शिल्पकार समाजाकडून उपेक्षित 

माणिक देसाई 
रविवार, 27 ऑगस्ट 2017

शिल्पकार विक्रम पवार यांनी व्यक्त केली खंत 

निफाड : ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता, प्रसंगी पोटाला चिमटा देऊन अनेक शिल्पकारांनी ओबडधोबड दगडांना मूर्त रुप दिले.  त्या दगडांतून अनेक मंदिरे, लेण्या, किल्ले, स्तूप यांची निर्मिती केली. आज हीच शिल्पं इतिहासाच्या पाऊलखुणा बनली आहेत. छन्नी, हातोड्याच्या सहाय्याने दगडांना मूर्त रूप देणाऱ्या शिल्पकारांनीच खऱ्या अर्थाने इतिहास जिवंत ठेवला असून आजच्या आधुनिक काळात मात्र शिल्पकारांनी उपेक्षा होत असल्याची खंत वणी येथील प्रसिद्ध शिल्पकार विक्रम पवार यांनी व्यक्त केली.

आपली खंत व्यक्त करत पवार म्हणाले , की मध्ययुगीन काळात सातवाहन, आर्य, गुप्त, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव आदी राजघराण्यांनी शिल्पकलेचा प्रोत्साहन दिले. त्यातूनच शिल्पकलेचा विकास होत गेला. वेरुळ, अजिंठा, धारापुरी, पितळखोरा, भाजे, कार्ले, पांडवलेणी, चामरलेणी यांसारख्या लेण्या असोत किंवा कोणार्क येथील सूर्यमंदिर, खजुराहो मंदिर, बारा ज्योतिर्लिंग, सिन्नर येथील गोंदेश्वर, झोडगे येथील माणकेश्वर, निफाडचे संगमेश्वर, मथुराई येथील मीनाक्षी किंवा दक्षिण शैलीत बांधले गेलेले करमाळा येथील श्री कमलादेवी मंदिर असो या मंदिरांच्या रूपाने इतिहास आपल्यासमोर उभा राहतो. 

सांची येथील स्तूप, सारनाथ स्तूप यांसारखे स्तूप असोत किंवा सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, खांदेरी यांसारखे जलदुर्ग असोत किंवा शिवनेरी, रायगड, प्रतापगड, दौलताबादचा देवगिरी किल्ला, अंकाई यांसारखे किल्ले असोत यातून आपल्याला इतिहासाचे ज्ञान होते. अलीकडच्या काळात मात्र माणूस  पैश्यामागे पळत असल्याने शिल्पकलेकडे कोणी फारसे लक्ष देत नसल्याचे पवार यांनी सांगितले. 

पवार हे वणी येथील बसस्थानकासमोर जयवीर हनुमान मूर्तीकार या नावाने रस्त्याच्याकडेला वडिलोपार्जित शिल्प व्यवसाय करतात. लोक येथे येऊन फारच कमी किंमत देतात तर याच मुर्त्या दुकानातून दुप्पट रक्कम देऊन घेतात अशीही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.