भाजपमध्ये नवीन सत्ताकेंद्र नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

नाशिक - महापालिकेत नवीन सत्ताकेंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून होत असल्याच्या आरोपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी खंडन केले असून, काही लोक गैरसमज निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिकेत भाजपचा प्रत्येक नगरसेवक विकासासाठी प्रयत्न करत आहे. पदाधिकाऱ्यांमध्येसुद्धा एकमत असल्याचे त्यांनी आज सांगितले.

शुक्रवारी महासभेच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या ६६ नगरसेवकांची आज गटनेते कार्यालयात बैठक झाली. आमदार व शहराध्यक्ष सानप यांच्यासह प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेते दिनकर पाटील, गटनेते संभाजी मोरुस्कर बैठकीला उपस्थित होते. 

काही महिन्यांपासून भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण झाला. महापौर, उपमहापौर यांच्या कार्यालयात गर्दी होण्याऐवजी स्थायी समिती सभापती व सभागृहनेत्यांच्या कार्यालयात नगरसेवकांची अधिक गर्दी होत असल्याने सत्तेचे नवे केंद्र तयार होत असल्याचा आरोप होत होता. विकासकामांसाठी निधी व अधिकाऱ्यांकडून कामे होत असल्याने नगरसेवकांचा ओढादेखील याच दोन पदाधिकाऱ्यांकडे होता. त्यातून पक्षांतर्गत वाद निर्माण झाल्याचे दिसत होते. त्यात मनसेच्या काळात झालेली कामे स्मार्टसिटीच्या यादीत टाकून भाजपकडून श्रेय घेतले जात असल्याचा आरोप होत होता. भाजपमध्ये कुठलाही वाद नाही. बहुतांश नगरसेवक नवीन असल्याने कामांची माहिती जाणून घेतली जात असल्याची सारवासारव त्यांनी केली. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असल्याने शहराच्या विकासासाठी निधी आणण्याची पुस्ती त्यांनी जोडली.