समाजाला हवे आणखी मल्टिस्पेशालिटी डॉक्‍टर - कुलगुरू डॉ. म्हैसेकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

नाशिक - लोकसंख्यावाढीसोबत विविध व्याधी वाढत चालल्या आहेत. आजारांचे प्रमाण वाढत असताना त्यावर उपचार करण्यासाठी बहुविशेषता (मल्टिस्पेशालिटी) प्राप्त डॉक्‍टरांची गरजदेखील वाढत चालली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी आज येथे केले.

नाशिक - लोकसंख्यावाढीसोबत विविध व्याधी वाढत चालल्या आहेत. आजारांचे प्रमाण वाढत असताना त्यावर उपचार करण्यासाठी बहुविशेषता (मल्टिस्पेशालिटी) प्राप्त डॉक्‍टरांची गरजदेखील वाढत चालली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी आज येथे केले.

द गेट-वे हॉटेल येथे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन्स व असोसिएशन ऑफ फिजिशियन, नाशिक यांच्यातर्फे होत असलेल्या मॅपकॉन २०१७ या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेत ते बोलत होते. कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांच्या उपस्थितीत चारदिवसीय परिषदेचे आज औपचारिक उद्‌घाटन झाले. याप्रसंगी पोलिस आयुक्‍त डॉ. रवींद्र सिंगल, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन्सचे अध्यक्ष डॉ. शिरीष चव्हाण, सहसचिव गिरीश राजाध्यक्ष, परिषदेचे निमंत्रक डॉ. नारायण देवगावकर, डॉ. माधुरी किर्लोस्कर, राजश्री पाटील, डॉ. मृणालिनी केळकर, डॉ. देवदत्त चाफेकर, डॉ. राहुल पाटील, डॉ. समीर शहा आदी उपस्थित होते. 

कुलगुरू डॉ. म्हैसेकर म्हणाले, की बदलत्या काळानुरूप सायबर सुरक्षेचे महत्त्व वाढलेले आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठ पुढील काळात पोलिस खात्याच्या सहकार्याने आवश्‍यक त्या बाबींचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पोलिस आयुक्‍त डॉ. सिंगल म्हणाले, की पोलिस व डॉक्‍टर यांच्यातील नाते वेगळेच असते. वैद्यकीय क्षेत्रातील बदल डॉक्‍टरांना माहीत व्हावेत यासाठी ही परिषद नक्‍कीच उपयुक्‍त ठरणार आहे. 

दरम्यान, आज दिवसभरात वेगवेगळ्या सभागृहांत परिसंवाद पार पडले. एम.डी. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शोधनिबंध सादरीकरण, तसेच पोस्टर सादरीकरण झाले. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. डॉ. अलका देशपांडे, डॉ. शैलजा काळे, डॉ. यश लोखंडवाला, डॉ. चारू साखला, डॉ. एस. पी. कुलकर्णी यांनी चर्चासत्रांतून सहभागी डॉक्‍टरांना मार्गदर्शन केले. चारदिवसीय परिषदेचा उद्या (ता. ८) समारोप होईल.