ज्येष्ठ ‘स्क्रीन’वर वाचताहेत आरोग्य, करमणुकीचे साहित्य

ज्येष्ठ ‘स्क्रीन’वर वाचताहेत आरोग्य, करमणुकीचे साहित्य

नाशिक - ज्येष्ठ नागरिक म्हटले, की चिडचिड करणारे. कुटुंबांमध्ये वाद घालण्यात रस असणारे अशी काहीशी प्रतिमा झालेली असताना ज्येष्ठांकडून आरोग्य अन्‌ करमणूकविषयक साहित्य तेही ‘इलेक्ट्रॉनिक्‍स गॅझेट’च्या पडद्यावर वाचन केले जातयं. हो! ‘स्क्रीन’वर वाचन करणाऱ्यांचे प्रमाण वीस टक्‍क्‍यांपर्यंत पोचलय. अगदी सिडको आणि सातपूर या कामगार वस्त्यांमध्येही वाचन संस्कृती रुळल्याचे चित्र अलीकडच्या काळात पाहावयास मिळत आहे.

दिवसभरातील वेळ कोठे आणि कसा घालवावा? असा प्रश्‍न ज्येष्ठांना पडत असणार, असे प्रत्येकाला वाटते. पण बदलत्या अभिरुचीमध्ये दिवसभरातील तीन ते चार तास वाचन करण्यात बरेच ज्येष्ठ कारणी लावताहेत.

वाचनामध्ये वर्तमानपत्रांना प्राधान्य मिळते. मग मासिके, साप्ताहिके चाळली जातात. या वाचनात अर्थात, आरोग्य व करमणूकविषयक माहितीचा समावेश असतो. कामगार वस्त्यांमध्ये धार्मिक पुस्तके मोठ्या प्रमाणात वाचली जात आहेत. कॉलेज रोड, गंगापूर रोड ते रविवार कारंजा भागातील ज्येष्ठ वाचन काय करत असतील बरे? हा प्रश्‍न तुम्हाला पडलेला असणार. त्याबद्दल माहिती घेतल्यावर सकाळी सर्वप्रथम वर्तमानपत्राची शीर्षके वाचून पूर्ण केली जातात आणि दुपारी आवडलेल्या बातम्या, लेख पूर्णपणे वाचून काढले जातात हे पाहावयास मिळाले. याशिवाय धार्मिक पुस्तकांचे वाचन करणारे अनेक ज्येष्ठ आढळून आले. कथासंग्रह, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, ऐतिहासिक कादंबऱ्या असे साहित्य वाचून हातावेगळे करणाऱ्यांचे प्रमाण ३० टक्‍क्‍यांपर्यंत असल्याचे चित्र या भागात दिसले. 

गृहिणींना आवडते ‘अपडेट’ राहणे
स्वयंपाकातील मेन्यूमध्ये नवे काय आहे? इथपासून ते आरोग्यवर्धक कोणते खाद्यपदार्थ करावेत? याबद्दलची जिज्ञासा ज्येष्ठ महिलांमध्ये असून, त्यातूनच अनेकींचा भर पाककृती वाचण्यावर आहे. ‘अपडेट’ राहणे आवडणाऱ्या महिलांनी ‘स्क्रीन’वरील वाचन कुटुंबातील नातवंडांच्या सहाय्याने सुरू केले. भद्रकाली, जुने नाशिक, नाशिक रोड, इंदिरानगर, गोविंदनगर भागांतील ज्येष्ठांचा कल वर्तमानपत्र वाचण्याकडे आहे.

त्यासाठी त्यांची पसंती सार्वजनिक वाचनालयांना आहे. पुस्तकांचे वाचन करणे शक्‍य होत नाही, अशांची पावले मंदिरांमधून चालणाऱ्या पोथीवाचन, प्रवचन, कीर्तन अशा कार्यक्रमांकडे आपसूक वळताहेत.

ठळक मुद्दे
‘स्क्रीन’ वाचनात सोशल मीडियाचा वाढलाय वापर
नाशिक रोड, वडाळा, उपनगरला वाचनालयांची मागणी
राधेय, मृत्युंजय, छावा, रामायण, महाभारत, भगवद्‌गीता, दासबोध, ययाती, हिंदू, कोसला हे वाचण्यावर भर
शिवाजी सावंत, रणजित देसाई, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, नारायण सुर्वे, विठ्ठल वाघ, शांता शेळके लोकप्रिय 

रोज सकाळी मी वर्तमानपत्रांचे वाचन करतो. त्यानंतर धार्मिक पुस्तके, मासिकांचे वाचन करत असतो. कॉलेज रोड, गंगापूर रोड, रविवार कारंजा भागात वर्तमानपत्रांखालोखाल धार्मिक पुस्तकांचे वाचन करणाऱ्या ज्येष्ठांचे प्रमाण पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत आहे.
- सुभाष भंडारी, गंगापूर रोड  

कामगार म्हणून निवृत्त झालो म्हणून काय झाले. उतारवयात वाचनाला अनेकजण दिवसभरातील दोन ते तीन तास देतात. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमुळे ज्येष्ठांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे हेही खरे आहे.
- विठ्ठल देवरे, गोविंदनगर   

पंचवटीतील ज्येष्ठांपैकी ८० टक्के जण वाचन करतात, असे पाहणीत आढळून आले आहे. त्यांच्या वाचनामध्ये दररोजच्या घडामोडी वाचण्याबरोबरच धार्मिक पुस्तके, कथा-कादंबऱ्या असतात. मासिके आणि साप्ताहिकांचे आवर्जून वाचन केले जाते.
- नथुजी देवरे, पंचवटी 

जुने नाशिक आणि भद्रकाली भागात वाचनसंस्कृती वाढण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे. सद्यःस्थितीत या भागातील ज्येष्ठ वर्तमानपत्र वाचण्यापुरते सीमित आहेत. त्यात सुधारणा करण्यासाठी वाचनालये वाढायला हवीत.
- एकनाथ मोरे, जुने नाशिक

घरामध्ये फावल्या वेळेत महिला मासिके, साप्ताहिके वाचतात. पाककृतीची पुस्तके वाचण्यावर भर असतो. नवे काही वाचण्यातून मनाला समाधान मिळते आणि नातवंडांना नवनवीन पदार्थ खाऊ घालून त्यांना खूश करण्याचे समाधान मिळते. 
- साधना तोरणे, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com