टंकलेखनाच्या शेवटच्या परीक्षेला एक लाख विद्यार्थ्यांची हजेरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

नाशिक रोड - राज्यातील सुमारे तीन हजारांवर टंकलेखन संस्थांतील टकटक बंद झाली असून, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शेवटच्या टंकलेखन परीक्षेला आज तब्बल एक लाख विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. टंकलेखन यंत्राची जागा आता संगणकाने घेतली आहे. परीक्षा परिषदेतर्फे शासननिर्मित नवीन संगणक टायपिंग अभ्यासक्रम (जीसीसी-टीबीसी) सुरू करण्यात आला आहे. 

गेल्या काही वर्षांपासून सर्व शासकीय कार्यालये संगणकीकृत झाल्याने मॅन्युअल टायपिंग यंत्र व संगणक सिस्टिम यांचा योग्य समन्वय ठेवून शासनाने संगणक टायपिंग अभ्यासक्रम प्रशिक्षण (जीसीसी-टीबीसी) शासनमान्य टायपिंग संस्थांना लागू केला. या नवीन अभ्यासक्रमात वर्ड, एक्‍सल, पीपीटी, लेटर आदींचा समावेश आहे. राज्यासह गोवा येथे मॅन्युअल टायपिंगची ७ ऑगस्टपासून परीक्षा सुरू होती. आज परीक्षेच्या शेवटच्या दिवसानंतर टंकलेखनाचा अनेक वर्षांपासूनचा खडखडाट बंद होणार आहे.

असे असले, तरी शेवटच्या घटका मोजेपर्यंत सुरू असलेल्या मॅन्युअल टायपिंग परीक्षेसाठी ९४ हजार ७२० व शॉर्टहॅंडसाठी १२ हजार ७०, अशा एकूण एक लाख ६ हजार ७९० विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरून शेवटपर्यंत चांगला प्रतिसाद दिला. यानंतर टंकलेखन यंत्रावरील परीक्षा कायमची बंद होणार आहे. आतापर्यंत हजारो संस्थाचालकांचा उदरनिर्वाह चालणारे टंकलेखन यंत्र इतिहासजमा होत आहे. ३० ते ४० वर्षांपासून व्यवसायाशी निगडित असलेल्या संस्थाचालकांनी याबाबत स्मृतींना उजाळा देत आधुनिक काळाजी गरज म्हणून संगणक टंकलेखन अभ्यासक्रमाचे स्वागत केले. जिल्ह्यातील सर्वच शासनमान्य टंकलेखन संस्थांनी नवीन संगणक टायपिंग अभ्यासक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. त्यास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
 
वीस वर्षांपासून टायपिंग इन्स्टिट्यूट चालवत आहे. टंकलेखन यंत्रांवरील टकटक बंद होत असल्याने वाईट तर वाटतच आहे. संगणक युगात शासकीय, निमशासकीय कार्यालयांतून टंकलेखन यंत्रे हद्दपार झाल्याने शासनाने नव्याने सुरू केलेला संगणक टायपिंग अभ्यासक्रम स्वागतार्ह आहे.
- तुषार म्हसके, श्रीसिद्धी टायपिंग इन्स्टिट्यूट, नाशिक रोड