कांदा खरेदी करू नका ! 

कांदा खरेदी करू नका ! 

नाशिक : "शहरी ग्राहकांना कांदा जास्त दराने खरेदी करावा लागत आहे. खबरदार, जर कांदा खरेदी कराल तर, तुमच्या मागे "ईडी'ची चौकशी लावू. आम्ही कांदा आयात करू, अशी सक्त ताकीद केंद्रीय ग्राहक मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कांदा व्यापाऱ्यांना दिली असल्याच्या माहितीने जिल्ह्यात व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कांद्याचे दर बाजार समित्यांत तीन हजारांच्या वर गेल्यानंतर दिल्लीतील ग्राहक मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने नाशिक व पुणे भागातील काही व्यापाऱ्यांना दिल्लीला बोलावून घेतले व कांदा खरेदी न करण्याबाबत ताकीद दिल्याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. 

दोनशे रुपयाने कांदा विकला जातो तेव्हा होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे ढुंकूनही न पाहणारे सरकार कांदा दोन हजाराच्या वर गेल्यानंतर मात्र दर पाडण्यासाठी क्‍लृप्त्या करीत असल्याचे आश्‍चर्य व्यक्त होते. शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरकारच्या याच प्रयत्नांमुळे मागील तीन दिवसांपासून कांदा दरात उतरण सुरू झाली आहे. कमाल ४ हजार व सरासरी ३५०० रुपये क्विंटलवरून कांदा दर कमाल २८०० व सरासरी २४०० वर स्थिरावले आहेत. हे सरकारी यंत्रणेच्या प्रयत्नांचे फळ असल्याचे आता लपून राहिले नाही. 

नाशिक जिल्ह्यात सरकारी यंत्रणेकडून ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कांद्याचे दर वाढणार नाहीत यासाठी कांदा व्यापाऱ्यांवर विविध मार्गाने दबाव टाकला जात आहे. व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या. स्टॉक लिमिटचे बंधन घालण्यात आले. नाशिकचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी नुकतीच व्यापारी व बाजार समित्यांच्या सचिवांची तातडीची बैठक घेत दररोज येणाऱ्या स्टॉकचा रिपोर्ट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याबाबत ताकीद दिली. यावेळी उपस्थित शेतकरी प्रतिनिधींनी जाब विचारला असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. 

लासलगाव, पिंपळगाव बसवंत, पुणे या बाजार समित्यांत कांद्याचे दर क्विंटलला २००० ते ४००० व सरासरी ३४०० वर पोचले असताना मागील तीन दिवसांत थेट दिल्लीच्या केंद्रीय ग्राहक मंत्रालयातून नाशिक व पुणे येथील तीन मोठ्या व्यापाऱ्यांना बोलावणे आले. या व्यापाऱ्यांना बोलावून घेत "तुम्ही काही दिवस खरेदी करणे थांबवा; अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू' असे सांगत धमकावण्यात आल्याचे सांगितले. सरकार कांदा आयात करील किंवा व्यापाऱ्यांची ईडी मार्फत चौकशी लावेल असा इशाराही देण्यात आल्यामुळे व्यापाऱ्यांनी नंतर खरेदीबाबत हात आखडता घेतला. परिणामी मंगळवारी (ता.२४) व बुधवारी (ता.२५) कांद्याच्या दरात क्विंटलमागे ३०० ते ७०० रुपयांनी उतरण झाली. 

""सरकारची शेतकरी विरोधी कृती अत्यंत दुर्दैवी आहे. मागील तीन वर्षे कांदा उत्पादक तोट्यात अाले आहेत. क्विंटलला २०० रुपयाचा दर मिळत असताना सरकारने ढुंकूनही पाहिले नाही. कांदा दर पाडण्याचा प्रयत्न करून सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेत आहे.'' 
- संतू पाटील झांबरे, कांदा उत्पादक, येवला, जि. नाशिक 

""व्यापाऱ्यांत दहशतीचे वातावरण आहे. अनेक मोठ्या व्यापाऱ्यांना खरेदी न करण्याबाबत सांगण्यात आले आहे. मागणी असूनही आम्ही कांदा विकत घेऊ शकत नाहीय. पॅकिंगचा खर्च न घेताही आम्ही शहरी ग्राहकांना कांदा पोच करायला तयार आहोत. मात्र अधिकारी दर पाडण्यावर अडून आहेत.'' 
- एक ज्येष्ठ कांदा व्यापारी, नाशिक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com