कांदा चार दिवसांत 400 रुपयांनी घसरला

कांदा चार दिवसांत 400 रुपयांनी घसरला

नाशिक - दिवाळीच्या सुटीनंतर लिलाव सुरू झाल्यावर कांद्याचे आगार असलेल्या लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याला क्विंटलला सरासरी 2 हजार 900 रुपयांपर्यंत भाव निघाला होता. आज चौथ्या दिवशी हेच भाव 400 हून अधिक रुपयांनी गडगडले आहेत. व्यापाऱ्यांवरील सरकारी निर्बंधामुळे ही परिस्थिती उद्‌भवल्याची तक्रार शेतकरी करु लागले आहेत.

लासलगावमध्ये 23 ऑक्‍टोंबरला 3 हजार 251 आणि सरासरी 2 हजार 900 रुपये क्विंटल या भावाने कांदा विकला गेला. दुसऱ्या दिवशी 2 हजार 770 रुपये क्विंटल असा सरासरी भाव होता. त्यानंतर मात्र कांद्याच्या भावाची घसरण सुरु झाली. बुधवारी (ता. 25) 2 हजार 560, काल (ता. 26) 2 हजार 425, तर आज 2 हजार 450 रुपये क्विंटल या सरासरी भावाने कांदा विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली.

दरम्यान, व्यापाऱ्यांनी सुट्यांच्या नावाखाली अनेक दिवस लिलाव बंद ठेवण्याचे कारण काय? असा गंभीर प्रश्‍न केंद्र सरकारतर्फे उपस्थित केला जात आहे. दिल्लीत आता झालेल्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. कांद्याची मागणी एका दिवसात वाढत नाही अथवा कमी होत नाही. त्यामुळे भावातील चढ-उताराचा वेग वाढण्याचे कारण काय? असा प्रश्‍न केंद्रापुढे तयार झाला आहे.

व्यापाऱ्यांनी कांद्याचा साठा अधिक काळ करुन ठेवू नये याबद्दलही केंद्र सरकार आग्रही आहे. एवढेच नव्हे, तर मुंबईमध्ये इजिप्तमधून पोचलेला 10 हजार टन कांद्याची विक्री झाली आहे. 17 रुपये किलो या भावाने इजिप्तचा कांदा पोच मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय आवश्‍यकता भासल्यास इजिप्तहून आणखी कांद्याची आवक करण्याची तयारी केंद्राने केली आहे. इजिप्त कांदा पोचण्यास बारा दिवसांचा कालावधी पुरेसा ठरतो ही बाब बैठकीत स्पष्ट करण्यात आली आहे. इजिप्तहून मागवण्यात आलेला कांदा मार्गावर असल्याची माहिती बैठकीमध्ये देण्यात आली आहे.

देशातील कांद्याचे भाव
(क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)

बाजारपेठ 23 ऑक्‍टोबर आज
आग्रा 2 हजार 250 2 हजार 550
बंगळूर 2 हजार 974 2 हजार 80
चेन्नई 4 हजार 3 हजार 800
कोलकता 3 हजार 500 3 हजार 125
पाटणा 3 हजार 200 2 हजार 750
मुंबई 3 हजार 400 2 हजार 650

कांदा मातीमोल भावाने विकला जात असताना सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही. आता शेतकऱ्यांना चार पैसे मिळताहेत म्हटल्यावर निर्यातीवर बंधने, आयात अशा मार्गाचा अवलंब केला जातो. त्यातूनही काही फरक पडत नाही म्हटल्यावर आता व्यापाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांचे हित पाहवत नाही का?
- चांगदेवराव होळकर (माजी अध्यक्ष, नाफेड)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com