वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या ‘फॅशन शो’त झळाळली डुप्लिकेट पैठणी  

वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या ‘फॅशन शो’त झळाळली डुप्लिकेट पैठणी  

येवला - म्हणायला केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग खात्याचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन... देशभरातील सर्वच राज्यांतील हातमाग, विणकाम होत असलेली उत्पादनांचे यात विशेष स्टॉल लावून ठेवण्यात आले होते. मात्र, राज्याचे महावस्त्र असलेल्या पैठणीची येथे मोठी अवहेलना झाल्याने सहभागी विणकरांचा भ्रमनिरास झाला. वास्तविक, पैठणीसाठी स्वतंत्र स्टॉल हवा होता. तो मिळाला; पण नागपूर येथील विक्रेत्याला. परिणामी, येवला व पैठण येथील विणकरांना आपली स्वउत्पादित पैठणी जगासमोर ठेवता आली नाही. गंभीर बाब म्हणजे प्रदर्शनात झालेल्या फॅशन शोमध्ये पैठणी झळाळली; पण ती चक्क डुप्लिकेट..!

गुजरातमधील गांधीनगर येथील भव्य मैदानावर वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे ‘टेक्‍स्टाईल इंडिया २०१७’ हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. जगभरातील सुमारे १०० देशांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला होता. वस्त्रोद्योगाचे कौतुक करीत देशभरात ७४४ हस्तकला क्‍लस्टरचे काम प्रगतिपथावर असल्याचे या वेळी मोदींनी सांगितले. प्रदर्शनाला पैठणीच्या या गावातून पुरस्कारप्राप्त पैठणी विणकर मनोज दिवटे, महेश भांडगे, रमेश परदेशी, पंकज पहिलवान, राजेंद्र नागपुरे, वामन वाडेकर, जितेंद्र पहिलवान, नितीन नाकोड, पैठण येथील मदन डालकरी, लायकभाई, नाशिक येथील विजय डालकरी हे विणकर बुनकर सहभागी झाले होते. देशभरातील सुमारे ५०० पुरस्कारप्राप्त कुशल तज्ज्ञ व विणकर या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला उपस्थित होते.

प्रदर्शनात हातमाग महामंडळातर्फे सोलापुरी चादर, बेडशीट, खादीचे कपडे यांचे स्टॉल लावले होते. मात्र, वस्त्रोद्योग मंत्रालयाला सातासमुद्रापार प्रसिद्ध असलेल्या पैठणीचा स्टॉल लावायचा विसर पडला. मुंबई येथील बुनकर सेवा केंद्राच्या अकार्यक्षमतेमुळे जागतिक दर्जाच्या पैठणीची जणू या प्रदर्शनात अवहेलना झाली असल्याचे विणकर सांगत आहेत. प्रदर्शनास धागानिर्मितीपासून कापडनिर्मिती, आधुनिक तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, हातमागाची प्रात्यक्षिके यासह विदेशातील धागा उत्पादकांशी विणकरांचा संवाद ठेवण्यात आला. तीन दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात हातमागावर तयार होणाऱ्या उत्पादनांच्या प्रदर्शनासाठी पैठणीच्या नावाखाली रॅम्प वॉकवर चालणाऱ्या मॉडेल्सनी ताणा (बेंगळुरूची साडी) साडीचे प्रदर्शन केले. हे पाहून पैठणी विणकरांनी नाराजी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने आनंद झाला होता. प्रवेशद्वारावर पैठणीचा मोठा फलक पाहून पैठणीचा सन्मान होईल, असे वाटले; पण आत मात्र उलट चित्र होते. पैठणी विणकरांना पैठणीचा स्टॉल लावण्याची व्यवस्‍था हवी होती. मात्र, तसे न झाल्याचे दुःख आहे.
- महेश भांडगे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पैठणी विणकर

वस्त्र उत्पादन करणाऱ्या कलाकारांना स्थान मिळालेल्या या प्रदर्शनात वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी पैठणी विणकरांच्या समस्या जाणून घेतल्या व चर्चाही केली. पैठणीचा स्टॉल कुठे आहे, याचीही माहिती त्यांनी घेतली. अस्सल पैठणीचे प्रदर्शन झाले नाही.
- मनोज दिवटे, पुरस्कारप्राप्त पैठणी विणकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com