हृदयविकारग्रस्त रुग्णाची रुग्णालयात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

जुने नाशिक - "डॉक्‍टर, मला मरायचे इंजेक्‍शन द्या', म्हणत देवळाली कॅम्प येथील किसन नाना पाटोळे (वय 56) यांनी संदर्भसेवा रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागाच्या खिडकीतून उडी घेत बुधवारी (ता. 7) जीवनयात्रा संपवली. बुधवारी (ता. 7) दुपारी 12 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. तीन दिवसांपूर्वी त्यांना हृदयाचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मृत किसन पाटोळे यांना हृदयाचा त्रास जाणवत असल्याने कुटुंबीयांनी रविवारी (ता. 4) शालिमार येथील संदर्भसेवा रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे हृदय 20 टक्केच काम करत असल्याने त्यांच्यावर रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांच्यावर 2012 मध्ये बायपास करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना काही दिवसांपासून पुन्हा हृदयाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल केले होते. भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनास पाठविला. वडिलांच्या मृत्यूच्या धक्‍क्‍याने त्यांच्या मुलीचीही तब्येत बिघडली. डॉक्‍टरांनी तिच्यावर उपचार केले.

काही महिन्यांपूर्वी रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात मूत्रपिंडाने त्रस्त रुग्णाने आजाराच्या नैराश्‍यातून खिडकीतून उडी घेत आत्महत्या केली होती. त्या घटनेची आजही रुग्णालयात चर्चा झाली. बुधवारी (ता. 7) पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती झाली.

रुग्णालयाच्या खिडक्‍या मोठ्या आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची संरक्षक जाळी नसल्याने खिडकीतून सहज उडी मारता येऊ शकते. दोन्ही रुग्णांनी खिडकीतूनच उडी मारून आत्महत्या केली.

Web Title: nashik news patient suicide