पाटोद्याच्या कब्रस्थानात फारसीतील शिलालेख

पाटोद्याच्या कब्रस्थानात फारसीतील शिलालेख

नाशिक - येवला तालुक्‍यातील पाटोदा येथील काली मशिदीशेजारील कब्रस्थानातील कबरीवर फारसी भाषेतील शिलालेख आहे. त्यातून या भागातील इतिहास संशोधनाची मोठी संधी उपलब्ध झाली असून, राज्याचे पुराभिलेख संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप बलसेकर हे लवकरच या भागाला भेट देणार आहेत.

पाटोदा हे गाव पूर्वी तालुक्‍याची राजधानी होती. येथील कब्रस्थानात शंभर मीटर अंतरावर एक तीस बाय वीसचे अर्धचंद्र आकाराचे दगडी बांधकामाची वास्तू लक्ष वेधते. तिच्याजवळ गेल्यावर एक भुयारी मार्ग दिसतो. हा भाग दुर्लक्षित असल्याने अर्धा दरवाजा मातीने बुजलेला आहे. इथेच वरच्या भागात एक दगडी पायऱ्यांचा रस्ता दृष्टिक्षेपात येतो. या पायऱ्यावर चढल्यावर समोरील बाजूला प्रार्थनास्थळासारखी जागा दिसते. त्याच्यासमोर चार कबरी दिसतात. त्यातील एका कबरीवर अरबी आणि फारसी लिपीतील मजकूर आहे. असाच आणखी एक शिलालेख प्रार्थनास्थळ भागामध्ये दिसतो. 

दगड-विटा आणि चुन्यात बांधकाम असलेल्या अर्धचंद्राकार वास्तूमध्ये काळाकुट्ट अंधार आहे. अभ्यासकांनी आतील भागात प्रवेश करताच, दगडांमध्ये एक दहा बाय दहा बाय दहा फूट आकारापर्यंतची कबर दिसली. शिलालेखाची छायाचित्राद्वारे माहिती घेण्यात आली. जळगावचे नाझीम शाह आणि इमरान तडवी यांनी माहिती पाठवली. त्यांच्या म्हणण्यानुसार ही कबर हिजरी सन ९८६ (इ. स. १५७७) मधील असून त्यावर मरहूम हुसेन ख्वाजा मोहंमद असे लिहिलेले आहे. नाशिकमधील डॉ. रवींद्र शिवदे यांनी शिलालेखावरील भाषा फारसी आणि नस्तलिक लिपीमधील आहे, असे सांगत त्यांनी इ.स. १५७७ मधील निजामशाहीच्या चांदबीबीच्या काळातील वास्तू असल्याचे स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com