आलिशान बांधकामांमुळे प्लंबिंगला सोन्याचे दिन

आलिशान बांधकामांमुळे प्लंबिंगला सोन्याचे दिन

प्रशिक्षणामुळे रोजगाराच्या अमाप संधी; दोन हजार कुशल मनुष्यबळाची वर्षाकाठी गरज

नाशिक - गेल्या अनेक वर्षांपासून प्लंबिंग क्षेत्र दुर्लक्षित समजले गेले; परंतु कधी पाणीटंचाई, तर कधी अतिवृष्टीमुळे शहर तुंबल्याने प्लंबिंग क्षेत्राचे महत्त्व वाढले. सद्यःस्थितीत या क्षेत्रात अपेक्षित कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे या क्षेत्रात उज्ज्वल करिअर करण्यासोबत पाणीबचतीतून सामाजिक कार्य करण्याची संधीदेखील खुली आहे. शहराच्या वाढत्या विस्तारानुरूप सुमारे दोन हजार कुशल मनुष्यबळाची गरज प्लंबिंग क्षेत्रात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

आजपर्यंत दुर्लक्षित व्यवसाय असलेल्या प्लंबिंग क्षेत्राला गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड मागणी वाढली. पूर्वी इमारतींचा ठरलेला साचा व मर्यादित गरजा होत्या; परंतु आज इमारतींची लांबी व रुंदी वाढली आहे. आलिशान बांधकामासोबत प्लंबिंगशी निगडित गरजादेखील वाढल्या आहेत. विशेष करून पाणीटंचाईचा मुद्दा ऐरणीवर असताना पाण्याची गळती थांबवत अधिकाधिक पाणीवापरासाठी उपलब्ध करून देण्यात प्लंबिंग व्यवसाय महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. 

मर्यादित मागणी असल्याने या क्षेत्रात ठोस शिक्षणक्रम नव्हता. म्हणून सद्यःस्थितीत प्लंबिंग क्षेत्रात सध्याचे मनुष्यबळ तांत्रिकदृष्ट्या कौशल्याधिष्ठित नाही. आयटीआयमार्फत प्लंबिंगचा शिक्षणक्रम उपलब्ध करून दिला आहे. मात्र त्यात बदलत्या गरजांचा अंतर्भाव केलेला नसल्याने तेथे मिळालेले शिक्षण व काम करताना येणारा अनुभव यात प्रचंड तफावत जाणवते. या क्षेत्रातील कौशल्याची तूट भरून काढण्यासाठी इंडियन प्लंबिंग स्किल कौन्सिलअंतर्गत प्लंबिंग विषयावरील प्रशिक्षणवर्ग सुरू आहेत.  

मनुष्याच्या व निसर्गाच्या आरोग्याशी प्लंबिंग व्यवसायाचा थेट संबंध आहे. आज माणसाच्या गरजा वाढल्या आहेत. त्यानुसार प्लंबर्सच्या मागणीतही वाढ झालेली आहे. सद्यःस्थितीत कुशल मनुष्यबळाची या क्षेत्रात कमतरता आहे. कौन्सिलच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी शिक्षणक्रमांची आखणी केली जात आहे. सध्याच्या मनुष्यबळाचे परीक्षण करून ग्रेड चाचणीद्वारे प्रमाणपत्र देत कुशल मनुष्यबळाची उपलब्ध करण्याचादेखील प्रयत्न आहे.
- मिलिंद शेटे, संचालक, इंडियन प्लंबिंग स्किल कौन्सिल

नळांनाही स्टार रेटिंगची गरज
इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंना त्यांच्या दर्जानुसार स्टार रेटिंग दिले जाते. त्याप्रमाणे पाण्याचे महत्त्व वाढत असताना, पाणीबचत करणारे नळ व अन्य उपकरणांनाही स्टार रेटिंग द्यावे, अशी मागणी इंडियन प्लंबिंग असोसिएशनतर्फे राष्ट्रीय स्तरावर केली आहे. या अनुषंगाने आगामी राष्ट्रीय कार्यशाळेत चर्चादेखील होणार आहे. भविष्यात नळांनाही स्टार रेटिंग आल्याने प्लंबिंग क्षेत्रावरील जबाबदारी या माध्यमातून वाढणार आहे.

पाणीगळती थांबविण्यासाठी हवे कुशल मनुष्यबळ
सद्यःस्थितीत पाणीपुरवठ्यासाठी धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यात निम्मी गळती होते. धरणातून पाण्याची उचल झाल्यानंतर ग्राहकांच्या नळापर्यंत पोचेपर्यंत गळती थांबविण्यासाठी ठोस अशी यंत्रणा नाही. त्यामुळे ही गळती थांबविण्यासाठी कुशल मनुष्यबळ महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com