पोलिस कॅन्टीनमध्ये किराण्याचा खडखडाट

पोलिस कॅन्टीनमध्ये किराण्याचा खडखडाट

नाशिक - राज्यभरातील पोलिस मुख्यालयांत असलेली ‘सद्‌भावना पोलिस कॅन्टीन’ किराणा मालाच्या पुरवठ्याअभावी काही बंद, तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. खुल्या बाजारभावापेक्षा सवलतीच्या दरात किराणा माल पोलिस कुटुंबीयांना मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे आर्थिक झळ सोसावी लागत आहे. दरम्यान, पुणे येथून केला जाणारा मालाचा पुरवठा तांत्रिक वादात अडकल्याचे समजते.

राज्यभरातील पोलिस मुख्यालयांत ‘सद्‌भावना वस्तू भांडार’ या नावाचे पोलिस कॅन्टीन गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या सद्‌भावना वस्तू भांडारात किराणा मालासह संसारोपयोगी वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जात. खुल्या बाजारातील मूल्यापेक्षा २५ ते ३० टक्के कमी किमतीत किराणा माल व घरगुती साहित्य मिळत असल्याने पोलिस कुटुंबीयांकडून खरेदीसाठी गर्दी असे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पोलिस मुख्यालयातील सद्‌भावना वस्तू भांडारात किराणा मालासह अन्य मालाचा पुरवठा होणे बंद झाले आहे. अगदी गेल्या दिवाळीतही पोलिस कॅन्टीनमध्ये किराणा माल आलाच नाही. त्यामुळे या कुटुंबीयांना खुल्या बाजारातून दिवाळीचा किराणा माल खरेदी करावा लागला. 

किरकोळ वस्तूच जास्त,ठोक पदार्थ क्वचितच
२०१३ पासून नाशिक पोलिस मुख्यालयातील कॅन्टीनमधील स्थितीही वेगळी नाही. या कॅन्टीनमध्ये सध्या फक्त साबण, झाडू, मसाल्याचे पदार्थ, अशा नाममात्र वस्तू शिल्लक आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून कॅन्टीनमध्ये किराणा माल आलेला नाही. दिवाळीत पोलिस कुटुंबीयांकडून किराणा मालाची सातत्याने विचारणा झाली. पण किराणा मालच न आल्याने पदरी निराशाच पडली होती. 

तांत्रिक वादाचा परिणाम
राज्यातील पोलिस कॅन्टीनला पुणे येथून किराणा माल व घरगुती वस्तूंचा पुरवठा केला जातो. मात्र, पुण्याचे पोलिस कॅन्टीन व पुरवठादार कंपनीत तांत्रिक वाद झाल्याने त्याचा परिणाम मालाचा पुरवठा करण्यावर झाला आहे. यामुळे राज्यभरातील बहुतांशी पोलिस कॅन्टीन  बंद पडल्या आहेत. पोलिस मुख्यालयाकडून पाठपुरावा केला गेला. मात्र, त्यास अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. तांत्रिक वाद मिटल्यानंतरच पोलिस कॅन्टीनमध्ये किराणा माल येऊ शकेल, असे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com