‘स्थायी’ सभापतिपदासाठी तिन्ही आमदारांत चुरस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

नाशिक - महापालिकेच्या सत्तेच्या राजकारणात सर्वांत महत्त्वाची समिती मानल्या जाणाऱ्या ‘स्थायी’च्या सभापतिपदावर आपल्या समर्थकाची वर्णी लावण्यासाठी शहरातील तिन्ही आमदार सक्रिय झाले आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातल्याची चर्चा आहे. भाजपांतर्गत वाढलेली धुसफूस पाहता वाद शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून सानपसमर्थक नगरसेवकांना तूर्त थांबवण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. ६६ नगरसेवक निवडून आल्याने प्रत्येक नगरसेवकाला सत्तेचा लाभ द्यावा लागणार आहे. भाजपनेसुद्धा त्याचदृष्टीने नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आरोग्य, विधी व शहर सुधार या तिन्ही नव्या विषय समित्यांची नियुक्ती करून त्यावर नगरसेवकांना सभापती व उपसभापतिपदाचा मान दिला आहे. नवीन विषय समित्यांच्या सभापतींना वाहनेही दिली. आता उपसभापतींसाठी वाहने देण्याचे नियोजन सुरू आहे. पक्षात सर्वांत ज्येष्ठ असलेले सतीश कुलकर्णी यांना आरोग्य व वैद्यकीय या त्यांनी यापूर्वी अनुभवलेल्या उपमहापौरपदापेक्षा तुलनेने कमी वजनदार असलेल्या समितीवर वर्णी लावत ज्येष्ठांची काळजी घेतली आहे. महापौरपदावर पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका रंजना भानसी यांना स्थान दिले, तर नवख्यांची नाराजी नको म्हणून उपमहापौर व स्थायी समितीचे सभापतिपद पक्षात नव्याने आलेल्या नगरसेवकांना दिले आहे.

पक्षांतर्गत नाराजी, धुसफूस वाढीस 
सत्तेचा काळ जसा लोटत आहे, त्याचप्रमाणात पक्षांतर्गत संघर्ष वाढीला लागला आहे. विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत. लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होण्याची शक्‍यता अधिक असल्याने पक्षांतर्गत सत्तासंघर्ष टोकाला पोचला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता स्थायी समिती सभापतिपदासाठी तिन्ही आमदारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. आतापर्यंत आमदार बाळासाहेब सानप यांचे पक्षांतर्गत वाढलेले वर्चस्व लक्षात घेता, पुढील काळात इतर आमदारांच्या समर्थक नगरसेवकांना संधी मिळावी, यासाठी प्रयत्न होत आहेत. मुख्यमंत्र्यांना तसे साकडे घालण्यात आले आहे.

Web Title: nashik news politics for standing chairman selection