प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अश्‍लील नृत्य अन्‌ पैशांची उधळण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

नाशिक - प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अश्‍लील नृत्य अन्‌ पैशांची उधळण झाल्याचा प्रकार शहरातील कामटवाडे परिसरात शुक्रवारी (ता. २६) घडला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला भाजपचे आमदार अपूर्व हिरे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यामुळे जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगत आहे.

नाशिक - प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अश्‍लील नृत्य अन्‌ पैशांची उधळण झाल्याचा प्रकार शहरातील कामटवाडे परिसरात शुक्रवारी (ता. २६) घडला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला भाजपचे आमदार अपूर्व हिरे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यामुळे जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगत आहे.

सिडको कामटवाडे भागातील माउली लान्सजवळ उत्तर भारतीय समाजाच्या वतीने माजी शिवसेना विभागप्रमुख बी. एल. श्रीवास्तव यांनी दरवर्षाप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मामा ठाकरे, किरण शिंदे, धनंजय बुचडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. उद्‌घाटन व सत्कारानंतर प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम बाजूला राहून या ठिकाणी नृत्य करणाऱ्या नृत्यांगनांकडून अश्‍लील नृत्य सुरू झाले. यातच समर्थकांकडून त्यांच्यावर पैशांची देखील उधळण होऊ लागली. मात्र, या कार्यक्रमाचे चित्रण केले जात असल्याचे कार्यक्रमाच्या धुंदीत कोणालाही भान राहिले नाही. समर्थक स्टेजवर नाचू लागले. 
शनिवारी (ता. २७) या कार्यक्रमाचे चित्रफीत माध्यामांमध्ये झळकताच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आणि चर्चा रंगू लागल्या. 

चार वर्षांपूर्वी देखील प्रजासत्ताक दिनानिमित्त अशाच कार्यक्रमाचे आयोजनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी कार्यक्रमावर आक्षेप घेतला होता. त्याचीच पुनरावृत्ती चार वर्षांनी पुन्हा दिसून आली. या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळीदेखील उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमाची कितपत दखल घेण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

या कार्यक्रमाशी माझा काहीही व थेट संबंध नाही. हा कार्यक्रम कशा स्वरूपाचा असेल, याची मला कुठलीही कल्पना नव्हती. आयोजकांनी विनंती केल्याने लोकप्रतिनिधी म्हणून दहा मिनिटे उपस्थित राहिलो. हा कार्यक्रम अश्‍लील होता, हे नंतर समजले. त्याचा मी निषेध करतो. 
- अपूर्व हिरे, आमदार

हा कार्यक्रम गेल्या पाच वर्षांपासून घेत आहे. समाजबांधवांच्या मनोरंजनाच्या हेतूने घेतला होता. कुठलाही अश्‍लील प्रकार घडलेला नाही. सामाजिक भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
- बी. एल. श्रीवास्तव, आयोजक

Web Title: nashik news porn dance in republic day event