खासगी विधेयकांचा मसुदा मार्चपर्यंत - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

नाशिक - "अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या किसान मुक्ती यात्रेची सांगता दिल्लीतील किसान मुक्ती संसदेने झाली. त्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींनी मांडलेल्या आक्रोशाच्या आधारे कर्जमुक्तीचा अधिकार अन्‌ उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव मिळणे, ही दोन खासगी विधेयक संसेदत मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा मसुदा मार्चपर्यंत तयार होईल,' अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे दिली.

शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या दोन विधेयकांना मान्यता मिळण्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना विनंती केली जाणार आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने 2014 च्या निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करण्यासाठी निर्णय घेतल्यास आनंद असेल. त्याच वेळी विरोधी पक्षांकडे समर्थनाचा आग्रह धरला जाईल, असे सांगून श्री. शेट्टी म्हणाले की, विधेयकांच्या मान्यतेसाठी शेतकऱ्यांचा रेटा वाढावा म्हणून तालुकास्तरापासून राज्यस्तरापर्यंत जनआंदोलन केले जाईल. चेंबूर ते मुंबई असा एक लाख बळिराजांचा मार्च काढला जाईल.

शेतकऱ्यांच्या मालकीचे साखर कारखाने ज्यांनी कवडीमोल किमतीत घेतले आहेत, अशांना बेड्या ठोकेपर्यंत आपण शांत बसणार नाही. मुंबई उच्च न्यायालयात यासंबंधाने याचिका दाखल करण्यात आली असून, त्याची सुनावणी लवकर होणार आहे, असे शेट्टी म्हणाले. भावनिक मुद्यावर सत्तेजवळ जाता येते, ही राजकीय भावना तयार झाली असून, प्रत्यक्षात शेतकरी, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्यावर निवडणुका लढवल्या जाव्यात, यासाठीची वातावरणनिर्मिती सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: nashik news private bill draft to march