महापालिका मुख्यालयात बंदूकधारी खासगी सुरक्षारक्षक

महापालिका मुख्यालयात बंदूकधारी खासगी सुरक्षारक्षक

नाशिक - प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासोबत महापालिका आयुक्तांचा वाद झाल्यानंतर महाराष्ट्र सुरक्षारक्षक मंडळाचे रक्षक नियुक्त करण्याच्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली. महापालिका मुख्यालयातच पहिल्या टप्प्यात पंचवीस सुरक्षारक्षक दाखल झाले असून, त्यात दोन बंदूकधारी रक्षकांचा समावेश आहे. पहिल्याच दिवशी सुरक्षारक्षकांनी त्यांच्या पद्धतीने कामाचा खाक्‍या दाखविला.

तीन महिन्यांपूर्वी आमदार कडू व महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर महापालिकेत खासगी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला होता. प्रस्ताव सादर करताना यापूर्वी पोलिस आयुक्तांनी दहशतवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षारक्षक नियुक्त करण्याच्या दिलेल्या सूचनांचा आधार घेण्यात आला. त्यानुसार एक कोटी ४५ लाख रुपये खर्च करून ४५ सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. महापालिका मुख्यालयास विभागीय कार्यालये, जलशुद्धीकरण केंद्रे व जलकुंभांवर सुरक्षा पुरविली जाणार आहे. आज पहिल्या टप्प्यात २५ सुरक्षारक्षक ड्यूटीवर हजर झाले. सर्व रक्षक महापालिका मुख्यालयात तैनात केल्याने मुख्यालयाला संसदेसारखे स्वरूप दिसून आले. महासभा असल्याने सर्व नगरसेवक झाडून हजर होते. नवीन सुरक्षारक्षकांना कोण नगरसेवक, कोण अधिकारी, कर्मचारी याची माहिती नसल्याने प्रत्येकाचे ओळखपत्र तपासण्यात आले. मनसेचे गटनेते सलीम शेख यांना कागदपत्रे तपासूनच आत प्रवेश मिळाला. माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांचीही तपासणी करण्यात आली. काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांना मागच्या दाराने प्रवेश न देता मुख्य प्रवेशद्वारावरूनच प्रवेश देण्यात आला. मुख्य प्रवेशद्वार व आयुक्तांच्या दालनाजवळ प्रत्येकी एक बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com