रेल्वेस्थानकातील स्वच्छतागृहाला शुल्क लागू

रेल्वेस्थानकातील स्वच्छतागृहाला शुल्क लागू

देवळालीगाव - रेल्वे प्रशासनाने खासगी प्रवासी वाहतूक कंपनीला सशुल्क पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिल्यानंतर आता प्रवाशांना स्वच्छतागृहासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. स्वच्छतागृहदेखील सशुल्क केले असून, त्यासाठी प्रवाशाला आता एक रुपया शुल्क द्यावे लागेल. शौचालयासाठी दोनऐवजी पाच, तर अंघोळीसाठी दहाऐवजी पंधरा रुपये मोजावे लागणार आहेत. 

रेल्वे प्रशासनाने कुंभमेळ्यानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी नाशिक रोड रेल्वेस्थानकाच्या हद्दीतील रेल्वे मालधक्‍क्‍यांसह संपूर्ण रेल्वेस्थानक परिसरात राहण्याची सोय, पिण्याचे पाणी, फिरत्या शौचालयांसह विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. कुंभमेळा संपल्यानंतर रेल्वेने फलाट एकवरील प्रथम श्रेणीच्या स्त्री-पुरुष अशा दोन्ही विश्रामगृहांतील स्वच्छतागृहांतील साफसफाईसाठी एका खासगी संस्थेला कंत्राट दिले होते. त्या वेळी त्या कंत्राटदाराने विश्रामगृहातील प्रवाशांकडून अंघोळीसाठी पाच, तर शौचालयासाठी दोन रुपये आकारणी केली होती. स्वच्छतागृह मोफत उपलब्ध करून दिले होते. ठेकेदाराची मुदत संपल्यानतर कुणाकडूनही शुल्क आकारले जात नव्हते. स्वच्छतागृहाची संपूर्ण सेवा मोफत उपलब्ध करून दिली होती.

रेल्वे प्रशासनाने गुरुवार(ता. २३)पासून फलाट क्रमांक १वरील विश्रामगृहांसह सर्व स्वच्छतागृहे, शौचालये व स्नानगृह या प्रकारच्या सुविधा सशुल्क केल्याने भुसावळ विभागात आदर्श रेल्वेस्थानक अशी ओळख असलेल्या नाशिक रोड रेल्वेस्थानकात स्वच्छतागृहासाठी शुल्क आकारले जाणार असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्‍त केली. यामुळे परिसरात स्वच्छता होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

सकाळी मुंबईची गाडी पकडण्यासाठी आम्ही घराबाहेर घाईने पडतो. अशा वेळी गाडी येण्याअगोदर आम्हाला लघुशंका आली, तर आमच्याजवळ एक रुपया सुटा नसेल तर मोठी अडचण निर्माण होणार आहे. रेल्वे प्रशासाने किमान स्वच्छतागृह सेवा मोफत करावे.
- विष्णू खाताळे, प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com