आला पावसाळा, प्राण्यांना गॅस्ट्रोपासून सांभाळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

लसीकरणाबाबत जागरूक राहण्याची गरज, आहारही महत्त्वाचा

लसीकरणाबाबत जागरूक राहण्याची गरज, आहारही महत्त्वाचा
नाशिक - कुत्रा, मांजर आणि अन्य प्राणी पाळण्याचा अनेकांना छंद असतो. तथापि, या प्राण्यांची योग्य निगा न राखल्यास त्यांना दुर्धर आजार होऊ शकतात. त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. सध्या पावसाळा असल्याने पाळीव प्राण्यांमध्ये गॅस्ट्रोची साथ पसरण्याची भीती असते. योग्य आहार आणि लसीकरणातून गॅस्ट्रोसह विविध आजारांपासून प्राण्यांना दूर ठेवता येऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात.

आज घराघरांत प्राणी पाळले जाताहेत. कुणी छंद म्हणून, तर कुणी प्रतिष्ठा म्हणून तर कुणी सुरक्षिततेसाठी कुत्र्याच्या विविध प्रजाती घरी आणत असतात. परंतु, प्राणी पाळण्याआधी खूप कमी लोक संबंधित प्राण्यांच्या देखभालीविषयी माहिती घेतात. हे दुर्लक्ष मनुष्याच्या जिवावरही बेतू शकते. त्यामुळे कुत्रा, मांजर किंवा अन्य प्राणी घरी आणण्यापूर्वी त्याविषयीची माहिती जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

कुत्र्यांमध्ये प्रामुख्याने रेबीज हा आजार जीवघेणा ठरत असतो. कारण रेजीब झालेला कुत्रा माणसाला चावला तर त्यासही हा आजार होण्याची शक्‍यता असते. रेबीजची लागणदेखील विशिष्ट प्रकारच्या विषाणूंमुळे होते. त्यामुळे सावधगिरी आणि लसीकरणाद्वारे बचाव करता होऊ शकतो. माणसाप्रमाणे पाळीव प्राण्यांनाही कावीळ होण्याची भीती असते. बहुतांश वेळा काविळीची लागण विषाणूंमुळे किंवा परजीवींमुळे होते. योग्य वेळी उपचार केल्यास आजार बरा होतो. याव्यतिरिक्‍त लहान मुलांप्रमाणे कुत्र्यांनाही नाक फुटणे, कान फुटणे आणि अन्य किरकोळ आजार होतात. मात्र घरगुती उपायांनी त्यावर मात शक्‍य असते. मात्र गंभीर आजारांसाठी डॉक्‍टरांचा सल्ला महत्त्वाचा असतो.

कसा होतो गॅस्ट्रो
गॅस्ट्रो किंवा गॅस्ट्रायटिसमध्ये अन्नातून गॅस्ट्रोचे जंतू नकळतपणे प्राण्याच्या पोटात जातात आणि आजाराची लागण होते. त्यांच्यात उलट्या, ताप, जुलाब इत्यादी लक्षणे दिसतात. बहुतांश वेळा कुत्र्यांना बाहेर फिरायला नेताना रस्त्यावर काही खाण्यात आल्यासही विषबाधा होऊन गॅस्ट्रोची भीती असते.

आहार ठरतो महत्त्वाचा
सुदृढ आरोग्यासाठी माणसाप्रमाणे पाळीव प्राण्यांसाठीही आहार महत्त्वाचा असतो. तज्ज्ञांच्या सल्यानुसार योग्य आहार जोपासल्यास व वेळोवेळी लसीकरण केल्यास प्राण्यांना विविध आजारांपासून लांब ठेवता येते, असे तज्ज्ञांचे मत आहे.