पहिल्याच पावसाने दाणादाण!

पहिल्याच पावसाने दाणादाण!

नाशिक - दिवसभराच्या उकाड्यानंतर आज सायंकाळी मुसळधारेने शहरात दाणादाण उडवून दिली. जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस झाला असला, तरी पावसाचे केंद्रबिंदू नाशिक शहर होते. शहरात अवघ्या दोन तासांत तब्बल चार इंच (९२ मिलिमीटर) पाऊस झाला. दोन तासांच्या मुसळधारेने महापालिकेच्या पावसाळीपूर्व कामांचे पितळ उघडे पाडले. सोबत पावसाच्या पाण्यात उफाळलेल्या गटारींचे पाणी मिसळून शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीत वाहने फसली. बुधवार बाजारात धावपळ झाली. सराफ बाजारात टपऱ्या उलटल्या. दुकानांत पाणी शिरले. हातगाड्या बुडाल्या. सायंकाळी गायब झालेला वीजपुरवठा उशिरापर्यंत सुरू झाला नव्हता.

सांडव्यावरून पाणी
दोन तासांच्या मुसळधारेमुळे बुधवार बाजारात एकच धांदल उडाली. पावसाच्या तडाख्यात भाजी विक्रीसाठी लावलेली दुकाने आवरताना त्रेधातिरपीट झाली. पावसाने साहित्य उचलण्याचीही संधी दिली नाही. त्यामुळे अनेक विक्रेत्यांना खराब माल तसाच दोन पावले पुढे जाऊन गंगेत फेकून द्यावा लागला. विक्रेत्यांची साहित्याची आवराआवर सुरू असतानाच, गटारींचे व पावसाचे पाणी सांडव्यावरून वाहू लागल्याने रामकुंडावर रस्ते जॅम झाले. त्यामुळे एकच पळापळ झाली. तशातच प्लास्टिक पिशव्यांचा खच रस्त्यावरच सोडून विक्रेते जमेल तसे निघून गेले. तुंबलेल्या पाण्याचे लोट थेट गोदावरीत मिसळले. गोदावरी तीरावरील वाहतूक काही वेळातच बंद झाली. तशीच स्थिती दहीपूल, सराफ बाजारात होती. गोदावरीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याने दुचाकी, चारचाकी वाहने अडकून पडली. रस्त्यावरील विक्रेत्यांना माल उचलण्याची उसंत मिळाली नाही. त्यामुळे माल वाहून गेला. पाण्यात वस्तू शोधण्याचे काम सुरू होते. 

वाहने, टपऱ्या पाण्यात
शहरातील पावसाचे पाणी उताराच्या दिशेने आल्याने सांडव्यानंतर भद्रकालीचा उतार, दहीपूल, सराफ बाजार या चौकांत रस्त्यांवर पाणी साचले. गटारींचे पाणी चेंबरमधून बाहेर पडल्याने शहरातील पावसाच्या व गटारीच्या पाण्याचा प्रवाह थेट गोदावरीच्या दिशेने जात होता. त्यामुळे काही मिनिटांत सराफ बाजार, दहीपूल येथील गल्ल्यांत पाणी शिरले. पाच फुटांपर्यंत पाणी साचून चारचाकी वाहने गडप झाली. सराफ बाजारात हातगाड्यांवर वस्तू विक्री करणाऱ्यांचे गाडे पाण्यात उलटले. पाण्यात पडलेले साहित्य जमा करून पुन्हा हातगाड्या उभ्या करण्यात विक्रेत्यांची त्रेधातिरपीट झाली. दुकानांत पाणी शिरले. सराफ बाजारात दाणादाण उडाली. 

ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
शहरातील सराफ बाजारानंतर गंगापूर रोड, सरकारवाडा, महात्मानगर, शालिमार, पुणे महामार्गावर बोधलेनगर भागात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. त्र्यंबकेश्‍वर मार्गावर आयटीआय सिग्नल, उंटवाडी परिसरातील सिटी सेंटर मॉलचा परिसर, अशा ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक ठप्प झाली. मेन रोड ते दहीपुलादरम्यान पाण्यातून दुचाकी व चारचाकी नेताना पाणी शिरल्याने वाहने बंद पडली. धक्का मारत वाहन नेण्याची वेळ अनेकांवर आली. रस्त्यावरचा बाजार काही वेळातच गायब झाला. रस्त्यावर वस्तू टाकून विक्रेत्यांना जावे लागले.

वीज गायब, तक्रारींची बोंब
दोन तासांच्या पावसाने वीजपुरवठाही खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत तो सुरू झाला नव्हता. वीज कंपनीने तक्रारी नोंदवून घेण्यासाठी टोल फ्री क्रमांकाची सोय केली आहे, पण त्या थेट मुंबईत दाखल होत असल्याने तक्रारींची बोंब होती. नाशिकच्या अडचणींबाबत थेट मुंबईत तक्रार, त्यानंतर दुरुस्ती, अशा चक्रात रात्री साडेनऊपर्यंत अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित होता. टाकळी, पंचक आणि पंचवटी उपकेंद्रांवरून वीजपुरवठा होणाऱ्या नाशिक रोड, पूर्व विभाग, जुने नाशिक, सायखेडा रोड या भागांतील अनेक उपनगरांत तो नव्हता. जेल रोडला रात्री उशिरा वीजपुरवठा सुरू झाला. पण टाकळी केंद्रावरील अनेक भागांत वीज  गायब होती.

ढगांची दुर्मिळ दाटी अनुभवास
एकाच वेळी विजांच्या कडकडाटासह वादळ व पाऊस पाडणाऱ्या ढगांची दाटी बुधवारी सायंकाळी नाशिकच्या अवकाशात पाहायला मिळाली. हवामानशास्त्रानुसार ही स्थिती दुर्मिळ असते. ती प्रत्यक्ष ढगफुटी नसते. हवामानशास्त्रात तिला ‘स्कल लाइन ऑफ कमलोनिबस क्‍लाउड’ असे म्हणतात. याच कारणाने अवघ्या दोन तासांत ९२ मिलिमीटर म्हणजे जवळपास चार इंच पाऊस झाला, अशी माहिती विजा व हवामानाचे अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी ‘सकाळ’ला दिली. तीन दिवसांपूर्वी बागलाण तालुक्‍यात नामपूर, अंबासन परिसरात अशी स्थिती झाली होती.

निफाडमधील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या
निफाड तालुक्‍यात आज दुपारी तीनच्या सुमारास दमदार पाऊस झाला. निफाडच्या गोदाकाठ, तसेच पश्‍चिम पट्ट्यातील पिंपळस, सुकेणे, ओणे, दात्याणे, दिक्षी, ओझर भागात दोन तास पाऊस झाल्याने शेतात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. सावरगाव येथे करमाई नदीला, तर खडकमाळेगाव येथील शेलू नदीला पूर आला. दिंडोरी तालुक्‍यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने आज दुपारी हजेरी लावली. सिन्नरच्या पूर्व भागातही जोरदार पावसामुळे शेतांमध्ये तळे निर्माण झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com