पावसाच्या धारा येती झरझरा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

नाशिक - ‘पावसाच्या धारा येती झरझरा, झाकळले नभ वाहे सोसाट्याचा वारा, रस्त्याने ओहोळ जाती खळखळ, जागजागी खाचांमध्ये तुडुंबले जळ’, कवयित्री शांता शेळके यांच्या ओळींचाच काहीसा अनुभव आज आला. गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात बरसल्यानंतर उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या शहरवासीयांनी काल मृगधारांचा मनसोक्त आनंद लुटला.

नाशिक - ‘पावसाच्या धारा येती झरझरा, झाकळले नभ वाहे सोसाट्याचा वारा, रस्त्याने ओहोळ जाती खळखळ, जागजागी खाचांमध्ये तुडुंबले जळ’, कवयित्री शांता शेळके यांच्या ओळींचाच काहीसा अनुभव आज आला. गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात बरसल्यानंतर उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या शहरवासीयांनी काल मृगधारांचा मनसोक्त आनंद लुटला.

सकाळपासून ऊन-सावलीचा लपंडाव सुरू होता. गर्मीने नागरिक हैराण झालेले असताना दुपारी चारला अचानक काळ्या नभांनी गर्दी केली अन्‌ गडगडाटासह पाऊस कोसळला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सिडको, इंदिरानगर, सातपूर, जुने नाशिक, नाशिक रोड परिसरातील सखल भागात पाणी साचले. अनेक ठिकाणी झाडे कोसळून नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. यादरम्यान शहरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले.

झाड कोसळून गाड्यांचे नुकसान
गंगापूर शिवारात काल सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. वादळामुळे सोमेश्‍वर लॉन्सजवळ असलेले झाड पाच गाड्यांवर पडले. त्या गाड्यांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

वातावरणात उत्साह 
वातावरणात दुपारी तीननंतर बदल झाला. शहरालगतच्या तालुक्‍यातील विविध ग्रामीण भागांतील खेड्यांमध्येही पाऊस झाला. शेतकरी कर्जमाफीची बातमी आणि पावसाची दमदार हजेरी अशा वातावरणात सायंकाळी खऱ्या अर्थाने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण होते. नाशिक शहराशिवाय इगतपुरी (३७. मिलिमीटर) पेठ (१ मिलिमीटर), देवळा (२.२ मिलिमीटर), येवला  (५ मिलिमीटर), बागलाण (२४ मिलिमीटर) येथे पावसाने दमदार  हजेरी लावली.

वीजपुरवठा खंडित
काल झालेल्या पावसामुळे नाशिक रोड भागातील बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या. पावसाने काही काळ उघडीप दिल्यानंतरही वीजपुरवठा वारंवार खंडित झाला. पावसाळ्यापूर्वी वीज विभागाकडून वाहिन्यांची दुरुस्ती, झाडांच्या फांद्या छाटणे ही कामे केली जात असली तरी पहिल्याच पावसात पुरवठा खंडित होण्याचे प्रकार झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.