मूलभूत सुविधांसाठी ‘रास्ता रोको’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

नाशिक - अंबड येथील शांतीनगर, गौतमनगर झोपडपट्‌टीवासीयांना घरपट्टी लागू करा, पंतप्रधान आवास योजनेचा लाभ द्या, या मागण्यांसाठी सहा दिवसांपासून उपोषण करूनही दखल न घेणाऱ्या प्रशासनाविरुद्ध आज शांतीनगर झोपडपट्टीतील शेकडो नागरिकांनी भर पावसात अचानक ‘रास्ता रोको’ केल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली. 

नाशिक - अंबड येथील शांतीनगर, गौतमनगर झोपडपट्‌टीवासीयांना घरपट्टी लागू करा, पंतप्रधान आवास योजनेचा लाभ द्या, या मागण्यांसाठी सहा दिवसांपासून उपोषण करूनही दखल न घेणाऱ्या प्रशासनाविरुद्ध आज शांतीनगर झोपडपट्टीतील शेकडो नागरिकांनी भर पावसात अचानक ‘रास्ता रोको’ केल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली. 

अंबड येथील गरवारे कंपनीमागील शांतीनगर, गौतमनगर या झोपडपट्‌टीत १९८५ पासून कामगार कुटुंबीय राहतात. दहा हजारांच्या या नागरी वस्तीला महापालिकेच्या आवश्‍यक सुविधा द्या; शौचालय, पाणी, पथदीप व्यवस्था करा; घरपट्टी लागू करा या मागण्यांसाठी सातत्याने आंदोलने करण्यात आली. मात्र, नागरी सुविधा देण्याची एकाचीही मानसिकता आजपर्यंत दिसली नाही. म्हणून सहा दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रशांत खरात, उमेश कांबळे, प्रवीण जाधव, विजय साळवे, अलका डाखुरे, रंजना कोडगे, राहुल उजागरे, शेख यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. या उपोषणकर्त्यातील डाखुरे यांची तब्येत खालावल्यानंतरही कोणीही दखल घेत नव्हते. दोघांचा रक्तदाब कमी होऊन त्यांनाही रुग्णलयात दाखल करण्याची वेळ आली, तरी प्रशासन पाहण्यास तयार नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी झोपडपट्टीतील नागरिकांनी दुपारी एकपासून अचानक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘रास्ता रोको’ सुरू केला. बंदोबस्तासाठी अवघे पाच-सहा पोलिस होते. त्यांना जमाव आक्रमक झाल्याचे कळले, त्यानंतर अर्धा-एक तासाने पोलिस पोचले. तोपर्यंत संतप्त जमावाने ‘रास्ता रोको’ करून गडकरी चौकापासून ते अशोक स्तंभापर्यंतची वाहतूक ठप्प करून ठेवली. पावसाची रिमझिम, त्यात वाहतूक कोंडीमुळे नागरिक वैतागले. या गर्दीतून मार्ग काढत पोलिस घटनास्थळी पोचले. आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याशी चर्चा केली. मात्र, हा प्रश्‍न महापालिकेच्या अखत्यारित असल्याने आपण केवळ सूचना करू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, महापालिकेला सातत्याने निवेदन देऊनही ते दखल घेत नसल्यानेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केल्याचे श्री. खरात यांनी स्पष्ट केले.

वर्दीतील माणुसकी 
या आंदोलनात काही महिला लहान मुलांनाही घेऊन आल्या होत्या. महिला आंदोलनात गर्क होत्या. पोलिस त्यांना पकडत होते. त्या वेळी त्यांची लहान मुले भरपावसात गारठली होती. त्यांना सहारा देणारे कोणीही नव्हते. त्या वेळी बंदोबस्तात असलेल्या महिला पोलिसांनीच त्यांना मायेची ऊब देऊन पावसापासून बचावासाठी गाडीत बसविले. त्यांना चहा, बिस्कीट, चॉकलेट देऊन शांत केले. यानिमित्ताने त्यांनी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडविले.