गृहरक्षक दलातील 21 वर्षे सेवा झालेल्यांना काढून टाकले

नरेंद्र जोशी
बुधवार, 5 जुलै 2017

नाशिक - गृह मंत्रालयाने गृहरक्षक दलामध्ये 21 वर्षे जवान म्हणून सेवा बजावलेल्यांना कमी करण्यात आले. एक जुलैपासून राज्यातील साडेसहा हजार होमगार्डसना काढून टाकण्यात आले आहे. मात्र, आता उतारवयात या होमगार्डसमोर रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

नाशिक - गृह मंत्रालयाने गृहरक्षक दलामध्ये 21 वर्षे जवान म्हणून सेवा बजावलेल्यांना कमी करण्यात आले. एक जुलैपासून राज्यातील साडेसहा हजार होमगार्डसना काढून टाकण्यात आले आहे. मात्र, आता उतारवयात या होमगार्डसमोर रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

गृहरक्षक दलात 20 ते 50 वर्षे वयोगटांतील महिला आणि पुरुषांची भरती केली जाते. निष्काम सेवा असल्याने इच्छा असेपर्यंत "ड्युटी' दिली जायची. त्यामुळे बऱ्याचदा अनेक जणांनी स्वतःहून कर्तव्य बजावणे थांबवले. आता मात्र सरकारने सक्तीने घरी बसवले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात किमान 200 जवानांचे 30 जूनपासून काम थांबले आहे. त्यामुळे या होमगार्डसच्या जागी 20 जुलैला नव्याने भरती केली जाणार आहे.

सेवेतून कमी झालेले जवान दहा रुपये रोज या वेळेपासून कर्तव्य बजावत होते. त्यांना चार वर्षांपासून चारशे रुपये रोज मिळायला लागला होता. त्यात पुन्हा वर्षातील जास्तीत जास्त शंभर दिवस बंदोबस्ताचे काम मिळत होते. त्यांना "ना प्रवास भत्ता-ना आहार भत्ता'. एका पोलिसाला दिल्या जाणाऱ्या प्रवास-आहार भत्याएवढा होमगार्डचा बारा तासांचा रोज व्हायचा. मात्र तरीही अनेकजण परिस्थितीमुळे या सेवेमध्ये टिकून होते.

आकडे बोलतात (नाशिक जिल्ह्यातील स्थिती)
पटावर होमगार्ड - 2 हजार 82 (महिला 434 आणि पुरुष 1 हजार 648)
220 पुरुष आणि 49 महिलांना 1 जुलैपासून सेवेतून केले कमी
नव्याने 602 पुरुष व 326 महिलांची 20 जुलैला होणार भरती

होमगार्ड म्हणून आम्हाला सन्मानाने काम करता यावे, एवढीच अपेक्षा होती. आम्ही वेतन अथवा वेतनाचा आयोग मागत नव्हतो. वेतनवाढीची अपेक्षा नव्हती. आम्हाला आमचे काम वयाच्या पन्नाशीपर्यंत करू द्या, एवढीच इच्छा होती. सेवेसंबंधीचा नियम नव्याने भरती होणाऱ्यांना लावावयास हवा होता. सरकारने घाईत निर्णय घेऊन महिलांना रस्त्यावर आणले. गरीब महिलांचा विचार करून त्यांना पूर्ववत कामावर घ्यावे, अशी अपेक्षा आहे.
- अलका गांगुर्डे (राष्ट्रपती पदकविजेत्या होमगार्ड)