भारतीय निवडणूक प्रक्रियेत सुधारणा आवश्‍यक - शिवराज पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

नाशिक - भारतीय लोकशाहीत निवडणुकीला जास्त महत्त्व आहे. निवडणूक सरकार स्थापन करण्यासाठी होते. आज गैरव्यवहार, निवडणुकांमधील घोळ, धनशक्तीच्या जोरावर उमेदवार निवडून येणे, अशा अनेक प्रश्‍नांनी आव्हान निर्माण केले आहे. लोकशाही बळकट करायची असेल, तर विधानसभा- लोकसभा, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका एकावेळी घेतल्या पाहिजेत. सुदृढ लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रियेत बदल होणे आवश्‍यक आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी व्यक्त केले. 

कुर्तकोटी सभागृहात शंकराचार्य न्यास आणि ज्योती स्टोअर्सतर्फे झालेल्या ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते ‘स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर भारतीय लोकशाहीचा प्रवास कोणत्या दिशेने’ या विषयावर ते बोलत होते. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार निशिगंधा मोगल, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. भगीरथ शिंदे, शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकर्णी, ज्योती स्टोअर्सचे संचालक वसंतराव खैरनार आदी उपस्थित होते. 

श्री. पाटील म्हणाले, ‘‘भारतीय राज्यघटना अनेक बारीकसारीक विचार करून तयार केली आहे. स्वातंत्र्यानंतर देशासमोर गरिबी, असमानता यांसारखे अनेक प्रश्‍न होते. आज सामाजिक असमानता कमी झाली आहे. गरिबी निश्‍चित कमी झाली असली, तरी आर्थिक विषमता वाढली. १३२ कोटी लोकसंख्या असतानाही आपण स्वयंपूर्ण आहोत. आज लोकशाही टिकून राहण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. भारतात निवडून आलेला व्यक्तीच पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा पदाधिकारी होऊ शकते. आज आंतरजातीय विवाह होतात; पण निवडणुका आल्या, की जात वर डोके काढते. आज कोणीही एका जातीच्या पाठिंब्यावर निवडून येऊ शकत नाही.’’ 

कलम ३७० फक्त काश्‍मीरसाठीच नाही, तर इतर ठिकाणीही लागू आहे. काश्‍मीरप्रश्‍नी काँग्रेस सरकारने योग्य भूमिका घेतल्याने ते आज भारतात आहे, अन्यथा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असता, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

संयोजकांकडून लांबला सत्कार
संयोजकांकडून लांबलेले सत्कार, प्रास्ताविक, परिचयामध्ये खूप वेळ गेल्याने शिवराज पाटील यांनी बोलायला उभे राहिल्याबरोबर सांगितले, की मी भाषण न करता फक्त तुमच्या प्रश्‍नांची उत्तरे देईल. त्यानंतर उपस्थितांमधून आलेल्या प्रश्‍नांवर फक्त त्यांनी भाष्य केले.