रस्ते, वाहतूक बेटनिर्मितीला मिळणार तांत्रिक जोड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

नाशिक - शहरात आतापर्यंत रस्ते व वाहतूक बेटे सौंदर्यात भर घालण्यासाठी तयार केली आहेत. परंतु त्यात तांत्रिक भाग नसल्याने वाढत्या शहरीकरणात ते रस्ते व वाहतूक बेटे निरर्थक ठरत आहेत. त्यामुळे यापुढे रस्ते किंवा वाहतूक बेटे तयार करताना तंत्रज्ञानाचा आधार घेण्यासाठी महापालिकेने खासगी कन्सल्टंट संस्थेतर्फे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या नावाखाली तयार झालेले प्रकल्प पांढरा हत्ती ठरू लागल्याने ते खासगीकरणातून चालविण्यासाठी काय करता येईल याबाबत सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी आज दिल्या.

शहरात दोन हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे रस्ते आहेत. रस्ते तयार करताना त्या भागातील गरज असतेच, परंतु त्यातील तांत्रिक बाबसुद्धा सांभाळणे गरजेचे असते. जेणेकरून पावसाळ्यात चेंबरपेक्षा अधिक रस्त्याची लांबी होऊन पाणी तुंबण्याचे प्रकार होत नाहीत. आतापर्यंत रस्ते तयार करताना याचा विचार झाला नसल्याने रस्त्यांचे डिझाइन नव्याने तयार केले जाणार आहे. धोकादायक रस्ते, सुरक्षित रस्ते याचे सर्वेक्षण होणार आहे. वाहतूक बेटे निर्माण करताना आतापर्यंत फक्त सौंदर्याचा विचार करण्यात आला. बेटेनिर्मिती करतानासुद्धा तंत्रज्ञानाची आवश्‍यकता असते, जेणेकरून वाहतूक ठप्प होणे, अपघात होणे असे प्रकार टाळता येणे शक्‍य आहे.

डोईजड प्रकल्पांचा विकास कसा करणार?
पाथर्डी फाटा येथे साकारलेले चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक, स्व. यशवंतराव चव्हाण तारांगण व पेलिकन पार्क हे प्रकल्प महापालिकेला डोईजड झाल्याने त्यांच्या विकासासाठी काय करता येईल? खासगीकरणातून देणे शक्‍य आहे का, याचा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. दर वर्षी या प्रकल्पांवर लाखो रुपये खर्च केले जातात, परंतु उत्पन्न प्राप्त होत नसल्याने असे प्रकल्प चालविणे आर्थिकदृष्ट्या शक्‍य नाही. त्यामुळे खासगी संस्थेतर्फे सर्वेक्षण केले जाणार आहे.