नाशिकचे ग्रामदैवत 'कालिका देवी'च्या अंगणात "सकाळ'तर्फे स्वच्छतेचा जागर 

सोमनाथ कोकरे
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

गेल्या दहा दिवसांत कालिकामातेच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक दाखल झाले होते. तसेच परिसरात यात्रा भरत असल्याने दसऱ्यानंतर उत्सवाची सांगता होत असतांना अस्वच्छता पसरली होती. या पार्श्‍वभूमीवर धार्मिक महत्व असलेल्या नाशिक नगरीत स्वच्छतेचा जागर करण्यासाठी "सकाळ'तर्फे परीसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात स्वच्छता मोहिम राबविली जाते आहे. या मोहिमेला प्रतिसाद देण्यासाठी "सकाळ' माध्यम समुहाने पुढाकार घेत आज (रविवार) नाशिकची ग्रामदैवत कालिका देवी मंदिर परिसरात स्वच्छता केली. नवरात्रोत्सवाच्या सांगतेनंतर परिसरात अस्वच्छता पसरली होती. ही गोष्ट लक्षात घेत कालिका देवीच्या अंगणात स्वच्छतेचा जागर करण्यात आला. "स्वच्छता ही सेवा' उपक्रमात महापौर रंजना भानसी यांच्यासह "सकाळ'चे कर्मचारी, लोकप्रतिनिधी, यंग इस्पिरेटर नेटवर्क (यिन) व तनिष्का सदस्य यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. या मोहिमेनंतर परीसरातील रूप पालटले होते. 

सकाळी आठला जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील कालिका मंदिर प्रवेशद्वारावर "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, महापौर रंजना भानसी यांच्यासह स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेते दिनकर पाटील, आरोग्य व वैद्यकीय समिती सभापती सतीश कुलकर्णी, पश्‍चिम प्रभाग सभापती डॉ.हेमलता पाटील, कालिकामाता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव आण्णा पाटील, खजिनदार सुभाष तळोजिया, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बुकाणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.सचीन हिरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली. 

गेल्या दहा दिवसांत कालिकामातेच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक दाखल झाले होते. तसेच परिसरात यात्रा भरत असल्याने दसऱ्यानंतर उत्सवाची सांगता होत असतांना अस्वच्छता पसरली होती. या पार्श्‍वभूमीवर धार्मिक महत्व असलेल्या नाशिक नगरीत स्वच्छतेचा जागर करण्यासाठी "सकाळ'तर्फे परीसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या उपक्रमात लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छता केली. यावेळी मुख्य रस्ता व मंदिर परीसर सहभागींनी झाडून काढला. "सकाळ'च्या नाशिक आवृत्तीतील संपादकीय विभाग, हिशेब, प्रशासन विभाग, जाहिरात विभाग, वितरण विभाग, मुद्रितशोधन विभाग, डिटीपी विभाग, प्रिटींग विभाग, मधुरांगण विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. 

रविवार कारंजा परिसरातही स्वच्छता मोहिमेस प्रतिसाद 
कालिकामाता मंदिर परीसराप्रमाणे वर्दळीचे ठिकाण असलेल्या रविवार कारंजा परीसरातही आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या उपक्रमात रविवार कारंजा मित्र मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील रोहोकले, सतीश आमले, ऍड. प्रवीण अमृतकर, अनिल गोरे आदी उपस्थित होते. "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, आरोग्य व वैद्यकीय समिती सभापती सतीश कुलकर्णी यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देत उपक्रमाचा आढावा घेतला. सहभागींनी स्वच्छता करत परिसराचे रूप पालटविले.

Web Title: nashik news: sakaal cleaning initiative