सुंदरनारायण मंदिरात ‘सकाळ कलांगण’

सुंदरनारायण मंदिरात ‘सकाळ कलांगण’

नाशिक - दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी आठला विविध ठिकाणी बहरणारा ‘सकाळ कलांगण’चा १९ वा उपक्रम रविवारी (ता. २९) अहिल्यादेवी होळकर पुलालगत असलेल्या सुंदरनारायण मंदिराच्या आवारात होणार आहे. या वेळी वास्तुविशारद बाळासाहेब मगर, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक श्रीकांत घारपुरे, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब पुजारी, ‘मायबाप’ कार्यक्रम सादर करणारे कलाकार अरुण इंगळे व राजेंद्र उगले उपस्थित राहतील. 

या मंदिराचे आगळेवेगळे स्थान आहे. सुमारे २६० वर्षांपूर्वीचे हे मंदिर पाषाणशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. राज्य शासनाच्या प्राचीन स्मारके व पुराण वास्तू विभागातर्फे हे मंदिर ‘राज्य संरक्षित स्मारक’ घोषित झालेले आहे. सध्या या मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. पंचवटीमधून नाशिकमध्ये प्रवेश करताच या मंदिराचे दर्शन होते.   

चित्रकलाप्रेमी, प्रशासकीय अधिकारी, इंजिनिअर, डॉक्‍टर, वकील, व्यावसायिक, गृहिणी, युवक-युवती या उपक्रमात सहभागी होतात. आपल्या मनातील चित्र, शिल्प, गाणे व नृत्य सादर करण्याचीही संधी ‘सकाळ कलांगण’ने उपलब्ध करून दिली आहे. कलानिकेतनच्या चित्रकला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिनकर जानमाळी, के. के. वाघ ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन वाघ, ‘मविप्र’च्या ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य नरवाडकर, अधिष्ठाता बाळ नगरकर, रचना चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य राजू दाणी, कोणार्कनगरच्या अनमोल चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत गोराणकर, दादाजी आहेर चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य रामभाऊ डोंगरे सहभागी होतात. कलाशिक्षकांच्या विविध संघटनांचे पदाधिकारीही सहभागी होतात. ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार, भि. रा. सावंत, व्यंग्यचित्रकार ज्ञानेश बेलेकर, चित्रकार राजेश सावंत, प्रफुल्ल सावंत, प्रा. दीपक वर्मा, अतुल भालेराव आदी चित्रकार सहभागी होतात. या दिग्गज कलाकारांच्या कलाकृती पाहण्याची संधी या उपक्रमामुळे मिळते. शहरातील नागरिकांना आपली कला व्यक्त करण्यासाठी या मुक्त व्यासपीठाची स्थापना केली असून, दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सर्व कलाकार एकत्र येऊन कला सादर करतात. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शुल्क आकारले जात नाही किंवा कोणतीही अट नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com