नाशिकच्या रामदास स्वामी मठामध्ये कला साधनेत कलावंत तल्लीन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

'सकाळ-कलागंण' उपक्रमात चित्राकृती रेखाटन, तबला वादन, अभिनय अन्‌ कवितांचे सादरीकरण

नाशिक : आभाळातून बरसणाऱ्या पावसांच्या धारा, खळखळत वाहणारे नंदिनी नदीचे पात्र, चोही बाजूंना हिरवळ झाडे, सोबत तबला वादनासह अभिनय सादरीकरण व कविता वाचन. अशा ऊर्जात्मक वातावरणात आज 'सकाळ-कलांगण' आगारटाकळी येथील रामदास स्वामींच्या मठात बहरला. मठातील श्री उद्भव स्वामी सभा मंडपात झालेल्या या कार्यक्रमात कलावंत आपआपली कला सादर करतांना तल्लीन झाले होते. मठासभोवतालचे नयनरम्य दृष्य कॅनव्हासवर उतरविण्यात चित्रकार दंग झाले होते.

संबंधित फोटो फीचर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

'सकाळ-कलागंण'च्या उपक्रमात आमदार देवयानी फरांदे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहसंचालक अशुतोष राठोड, उपजिल्हाधिकारी तथा कवि देविदास चौधरी, 'निमा'चे अध्यक्ष मंगेश पाटणकर, तबलावादक निसर्ग देहूकर, ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार, भि. रा. सावंत, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश सावंत, रामदास स्वामी मठाचे विश्‍वस्त ज्योतीराव खैरनार, सुधीर शिरवाडकर, ऍड. दिलीप कैचे, नगरसेवक राहुल दिवे, अनिल ताजनपुरे, नगरसेविका आशा तडवी, नामदेव हिरे, भास्कर ओढेकर, दीपक हिरे, प्रशांत पवार, 'तान'चे अध्यक्ष दत्ता भालेराव आदी यावेळी उपस्थित होते.

निसर्ग देहूकर यांनी बहारदार तबलावादन केले. तर देविदास चौधरी यांनी कविता सादर केली. राहुल कहांडळ या युवकाने कविता सादर केल्यानंतर कुणाल चौधरी या युवकाने गीटार वादन केले. चित्रकार दीपक वर्मा यांनी रेखाटलेली गणरायांची विविध रूपे व चित्रकार रमेश जाधव यांनी रेखाटलेले रामदास स्वामी मठाच्या चित्रकृतींचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले होते.