वेतनकपातीचे संकट टळले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

नाशिक - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल 24 दिवसांचा पगार कपात करण्याचा इशारा हवेतच विरला असून, या महिन्याचे पगार रजिस्टर तयार करण्याची कार्यवाही सुरू झाल्याने कर्मचारीवर्गाला तूर्त दिलासा मिळाला.

नाशिक - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल 24 दिवसांचा पगार कपात करण्याचा इशारा हवेतच विरला असून, या महिन्याचे पगार रजिस्टर तयार करण्याची कार्यवाही सुरू झाल्याने कर्मचारीवर्गाला तूर्त दिलासा मिळाला.

एसटी कर्मचाऱ्यांचा कोणताही संप न्यायालयाने बेकायदेशीर ठरविल्यास एक दिवसामागे सात दिवसांचा पगार कपात केला जावा, असा नियम "एसटी'नेच केला आहे. तीन दिवस संप चालल्यानंतर 24 दिवसांचा पगार कपात केला जाणार, असा इशारा गेल्या आठवड्यात देण्यात आला होता. मात्र, मोठ्या संख्येने कर्मचारी असलेल्यांचा एवढा पगार कपात झाल्यास कर्मचारी विरोधात जातील. राजकीयदृष्ट्याही परिवहनमंत्र्यांना हा निर्णय परवडणार नाही. त्यामुळे वेतनकपात करणे शक्‍य होणार नाही, अशी कर्मचारी संघटनांची भावना होतीच. मात्र, दुसरीकडे न्यायालयाने त्याबाबत विचारणा केल्यास काय उत्तर देणार, हा प्रश्‍न उपस्थित झाला होता. कारण नियमानुसार कारवाईचा नियम आहे. जर नियम पाळले जात नसतील तर करता कशाला, असा प्रश्‍न न्यायालयात उपस्थित होण्याची भीती विधी अधिकारी उपस्थित करत होते. मात्र, दरमहा 24 तारखेलाच पगार रजिस्टर तयार करणाऱ्या प्रशासनाला अद्याप तरी पगारकपातीबाबत कोणताही आदेश नसल्याने कर्मचारीवर्गाने सुटकेचा निःश्‍वास टाकला.

आवडेल तेथे प्रवासाला मुदतवाढ
दरम्यान, आवडेल तेथे प्रवास करणाऱ्यांची संपकाळात गैरसोय झाली. ती दूर करण्यासाठी आता त्यांना पुन्हा सवलत पास देण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. एसटी प्रशासनाने आता प्रवास न केलेल्या दिवसाचा कालावधी 31 डिसेंबरपर्यंत वाढविला आहे. या काळात त्यांना हा उर्वरित दिवसांचा प्रवास करता येईल. त्यासाठी विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापकांना अधिकार देण्यात आले आहेत.