"समृद्धी'च्या मार्गातील "पेसा'चा अडसर दूर 

"समृद्धी'च्या मार्गातील "पेसा'चा अडसर दूर 

नाशिक - राज्यातील प्रमुख प्रकल्पांतील भूसंपादनात अडथळा ठरणाऱ्या आदिवासी भागातील "पेसा' गावांतील जमीन संपादनातील अडथळ्यावर मात करण्यासाठी राज्यपालांनी अध्यादेश काढला आहे. "समृद्धी महामार्गा'साठी जमिनी घेण्यासाठी सध्या पेसा क्षेत्रातील ग्रामसभेच्या मान्यतेची अट राज्यपालांच्या अध्यादेशाने शिथिल केली आहे. त्यामुळे या अधिसूचनेनुसार "पेसा' क्षेत्रातील जमीनमालकांना स्वतःहून संमती दिल्यास ग्रामसभेच्या मान्यतेची गरज राहणार नाही. या अध्यादेशामुळे मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग प्रकल्पातील भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या महामार्गाच्या भूसंपादनात इगतपुरी तालुक्‍यातील 23 पैकी 19 गावे पेसाअंतर्गत मोडणाऱ्या गावांचा अडसर होता. 19 पैकी अवघ्या 4 ग्रामसभांनी भूसंपादनाला संमती दिली आहे. पेसा क्षेत्रातील 90 हेक्‍टर जमीन प्रशासनाला संपादित करायची आहे. इगतपुरी हा आदिवासीबहुल तालुका असल्यामुळे आदिवासींच्या जमिनी फक्त आदिवासींनाच खरेदी करता येतात. पेसाअंतर्गत गावांतील जमिनीचे भूसंपादन करण्यापूर्वी ग्रामसभेचा ठराव मिळविताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले होते. त्यामुळे पेसाअंतर्गत भूसंपादनाचा अडसर दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडून मार्गदर्शन मागविले होते. 

आधी कजर्माफी द्या, मग जमिनीचे बघू  
इगतपुरी व सिन्नर तालुक्‍यातून 100.61 किलोमीटरचा महामार्ग असणार आहे. दोन्ही कामांसाठी 49 गावांतील 1290.8 हेक्‍टर भूसंपादन होणार आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात 204 हेक्‍टर जमिनीचे संपादन झाले आहे. इगतपुरीत भारत पेट्रोलियमची पाइपलाइन आणि आता समृद्धीच्या भूसंपादनाला अडथळा येत आहे. प्रकल्पात जमिनी गेलेल्या बहुतांश शेतकऱ्यांवर कर्ज आहे. त्यामुळे आधी कर्जमाफी होऊ द्या, मग बघू, अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली. या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्यपालांच्या पेसा कायद्यातील बदलाच्या अध्यादेशामुळे समृद्धी प्रकल्पातील भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com