वाट्टेल ते करा, पण भाजपची जिरवा - राऊत 

वाट्टेल ते करा, पण भाजपची जिरवा - राऊत 

नाशिक - वाट्टेल ते करा, पण भाजपची जिरवा, असा कानमंत्र शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी कालज स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिला. आगामी 2019 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नाशिकमधील चारही मतदारसंघांत शिवसेनेचे आमदार विजयी करून पराभवाचे उट्टे काढा, असे आवाहन करतानाच, संपूर्ण ताकदीनिशी लढण्याची रणनीती तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शालिमार चौकातील शिवसेना भवनात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत श्री. राऊत बोलत होते. नाशिकचे संपर्कप्रमुख अजय चौधरी, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते उपस्थित होते. श्री. राऊत म्हणाले, की राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा कचरा झाला आहे. त्यामुळे "येडा विकासा'ला जागा दाखवून देण्यासाठी फक्त शिवसैनिक आहेत. त्यासाठी आपली रणनीती ठरलेली आहे. श्री. राऊत यांनी दिवसभर शहर व जिल्ह्याच्या काही भागात धावता दौरा केला. सध्या राज्य आणि केंद्रात सत्तेत राहूनही भाजप आणि शिवसेनेत वाढलेल्या दुराव्याचे प्रत्यंतर श्री. राऊत यांच्या दौऱ्यातून आले. राऊत यांनी भाजपला "टार्गेट' करत संघटनात्मक पातळीवर मित्रपक्षाच्या विरोधात धार वाढविण्यावर विशेष भर दिल्याचे प्रकर्षाने जाणवले. महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली होती. पण नाशिककरांचा रोष शिवसेनेला "कॅश' करता आला नाही. त्यातच निवडणुकीनंतर पक्षांतर्गत असंतोषाची खदखद कायम असल्याने श्री. राऊत यांना पक्षाची रणनीती कार्यकर्त्यांपुढे ठेवावी लागली. 

महिला शिवसैनिक कुठेय? 
शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला हाताच्या बोटावर मोजण्याइतपत महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. त्यावर श्री. राऊत यांनी पदाधिकाऱ्यांकडे "महिला शिवसैनिक कुठेय?', अशी विचारणा केली. महिलांची अत्यल्प उपस्थिती ही चिंतेची बाब असल्याचे सांगत महिला कार्यकर्त्यांची संख्या वाढविण्यासाठी विशेष उपक्रम राबवा. महिलांशी संपर्क वाढवा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, ऍड. श्‍यामला दीक्षित, शिवाजी सहाणे, माजी महापौर यतीन वाघ, संजय चव्हाण हेही उपस्थित होते. सुरवातीला श्री. बोरस्ते यांनी तक्रारींची चर्चा न करता केवळ पक्षवाढीसंदर्भातील बोलण्याचे आवाहन केले. पक्षासाठी काम केल्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर निष्ठावानांना डावलले जाते, आयारामांना पदे दिली जातात, अशा तक्रारी केल्या. श्री. गोडसे यांनी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा सूर लावला. 

आयारामांचे स्वागत करा 
आपले बोट धरून चालायला शिकलेले आज आपल्यावर डोळे वटारताहेत. आयारामांच्या जिवावर पक्ष वाढवताहेत. मग आता आपणही आयारामांचे स्वागत करायला हवे. "आयारामां'च्या भरवशावर पक्षवाढ करायला हवी. आपण निष्ठावान म्हणून किती दिवस भांडत बसायचे. शिवसेना वाढली, तर शिवसैनिक मोठे होतील. आयारामांना आपल्याकडे संधी मिळून पक्षवाढीसाठी मदत होत असेल, तर का म्हणून त्यांना डावलायचे? त्यांना येऊ द्या, पक्षात घ्या. नव्याने पक्षबांधणी करा. आपली उणी-धुणी काढण्यापेक्षा पक्षवाढीचा विचार प्राधान्यक्रमाने अमलात आणा, अशा सूचनाही श्री. राऊत यांनी केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com