बिटको रुग्णालयाच्या कामावरून शिवसेना, राष्ट्रवादीचा सभात्याग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

नाशिक - बिटको रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे काम अपूर्ण असताना काम सुरू असलेल्या इमारतीत आठ कोटींची यंत्रसामग्री खरेदी केली जात असल्याने त्यास विरोध करत शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष नगरसेवकांनी सभात्याग केला.

नाशिक - बिटको रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे काम अपूर्ण असताना काम सुरू असलेल्या इमारतीत आठ कोटींची यंत्रसामग्री खरेदी केली जात असल्याने त्यास विरोध करत शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष नगरसेवकांनी सभात्याग केला.

शहरात सुरू असलेल्या मोफत अंत्यसंस्कार योजनेला अंतिम तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. यापूर्वी निविदा काढण्याऐवजी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. नाशिक रोड विभागातील बिटको रुग्णालयाच्या इमारत विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. इमारत पूर्ण झाली नसताना साडेचार कोटी, एचटी कनेक्‍शनसाठी सप्लाय केबल टाकण्यासाठी ४६.८० लाख, जनरेटर सेट व पॅनल बसविण्यासाठी ९९.६६ लाख, लिफ्ट बसविण्यासाठी एक कोटी ९० लाख, असे विजेचे साहित्य खरेदीचे आठ कोटींचे प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर सादर करण्यात आले. शिवसेनेचे सूर्यकांत लवटे यांनी रुग्णालयाच्या कामाची प्रथम पाहणी करावी. त्यानंतर साहित्य खरेदीचा निर्णय घेण्याची मागणी केली. खरेदीत घाई करू नये, अशी त्यांची मागणी होती. अपक्ष मुशीर सय्यद यांनी लवटे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. इमारतीची पाहणी करण्याचे व बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत यंत्र खरेदीच्या वर्कऑर्डर न देण्याचे सभापती गांगुर्डे यांनी मान्य केले. सभापती विषय मंजुरीवर ठाम राहिल्याने अखेरीस श्री. लवटे यांच्यासह प्रवीण तिदमे, भागवत आरोटे, अपक्ष सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र महाले यांनी सभात्याग केला.

जुन्या नाशिकमध्ये पाणीटंचाई
जुने नाशिक भागातील पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या चार महिन्यांपासून विस्कळित पाणीपुरवठ्या मुळे महिलांचे हाल होत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात पाणीप्रश्‍न उद्‌भवल्याने जनआंदोलनाचा इशारा नगरसेविका वत्सला खैरे यांनी दिला.

भूसंपादनासाठी हात सैल
रस्ते, पाणीपुरवठा, उद्यान, बांधकाम यांसारखी महत्त्वाची कामे करण्यासाठी महापालिकेकडे निधी नाही. नगरसेवकांच्या नस्तींवर तसा शेरा मारून फाइल पुन्हा पाठविली जात असताना, आज स्थायी समितीसमोर भूसंपादनाच्या दोन प्रस्तावांना तातडीने मान्यता देण्यात आली. नगरसेवक जगदीश पाटील, मुकेश शहाणे, मुशीर सय्यद, सूर्यकांत लवटे यांच्यासह प्रवीण तिदमे यांनी विरोध दर्शवला. पण भूसंपादनाचे प्रस्ताव रस्त्यांचे असल्याने तातडीने मंजुरी देण्याचे सभापती गांगुर्डे यांनी जाहीर केले.